Breaking News LIVE : सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Breaking News LIVE Updates, 19 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2021 11:18 PM
दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी, न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या अध्यक्षतेखालील कोर्टाचं कामकाज, दहावीच्या परिक्षांबाबत दाखल याचिकेवर राज्य सरकारची भूमिका काय?, हायकोर्टाचा सवाल, विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत इतका महत्त्वाचा विषय असताना महाधिवक्ता का हजर झाले नाहीत - हायकोर्ट, दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे की नाही?, हायकोर्टाचा सवाल, विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर का नाही?, एरव्ही इतर प्रकरणांत वकिलांची फौज उभी करता?, विद्यार्थ्यांसाठी कुणीही जेष्ठ वकील का येत नाही? प्रकरणातली गंभीरता ओळखा, हायकोर्टाचा राज्य सरकारला इशारा, उद्या, गुरूवारी हायकोर्टात पुन्हा होणार सुनावणी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण, खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी करत अर्ज

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप, खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी करत अर्ज,


न्यायाधीश व्ही. व्ही. विद्वांस यांचा अर्जावर सुनावणी घेण्यास नकार, या  प्रकरणावर प्रधान न्यायमूर्तींसमोर यापूर्वी सुनावणी झाल्यानं आपण त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही - न्या. विद्वांस, 


खटल्याची सुनावणी 2 जून पर्यंत तहकूब

सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू,  सीबीआयच्या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्याची राज्य सरकारची मागणी, सचिव वाझेंना पुन्हा सेवेत सामावून घेणं आणि पोलीस अधिका-यांच्या बदल्यांबाबत दाखल गुन्ह्यात उल्लेख,  न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे ऑनलाईन सुनावणी सुरु

आज राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी, तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान

सैन्यभरती पेपर लीक प्रकरणात पुणे पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी अटक

सैन्यभरती पेपर लीक प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी अटक केली आहे. लष्कराचे लेफ्टनंट कर्नल भगतप्रीतसिंग बेदी यांना अटक. आरोपीस सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा,  NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्स

NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्स नुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा, आधी सहा महिने आणि नंतर नऊ महिने अशा शिफारसी करण्यात आल्या होत्या,  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे यांची ट्वीटरवरुन माहिती

यवतमाळमधील आर्णी येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी 

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे सकाळ पासून नवीन खरीप पीक कर्ज मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर मोठी गर्दी केली आहे. या बँकेत आज सकाळपासूनच शेतकरी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. कोरोना काळात संसर्ग होवू नये म्हणून जिल्ह्यात कडक निर्बध असले तरी पुढे खरीप हंगाम साठी बियाणे खतांसाठी तजवीज करण्यासाठी शेतकरी बँकेसमोर रांगेत पाहायला मिळत आहे. 

पोलिसांचा पाठलाग चुकवणारी जीप कालव्यात पडली, तीन जण जखमी

पोलिसांचा पाठलाग चुकवणारी जीप माळशिरस तालुक्यातील काळंमवाडी येथे कालव्यात पडली . जेसीबीच्या साहाय्याने जीप बाहेर काढली असून या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. 


 

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोकणचा दौरा करणार

येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत

नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ,आरोग्य अधिकारी निकटवर्तीयांनाच लाभ देत असल्याचा आरोप

नांदेड जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने प्रत्यक लसीकरण केंद्रास दररोज 100 लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु लसींचा हा अत्यल्प लाभ सुरळीत व निकोप देण्यास प्रशासनाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत ठरलंय. कारण नांदेड शहरातील गुरु गोविंदजी शासकीय रुग्णालयात लसीकरणाच्या या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्राच्या कक्षात गोंधळ घातलाय. शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरणाचा दूसरा डोस न देता निकटवर्तीय व नातेवाईकांना याचा लाभ देत असल्याचा आरोप करत गोंधळ घातलाय. लसीकरणासाठी नोंदणी केलेले नागरिक सकाळी सहा वाजल्या पासून रांगेत ताटकळत उभे राहतात सुरवातीला पाच दहा रांगेतील नागरिकांना लस दिल्या जाते व नंतर आरोग्य अधिकारी ,कर्मचारी आपल्या निकटवर्तीयांना च लस देतात व नंतर लस संपली असे सांगतात असा आरोप नागरिक करत आहेत.त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी लसीकरण कक्षात राडा घातलाय.लसीकरण केंद्रावरील हा गोंधळ व तंटा  मिटवण्यासाठी शेवटी पोलिसांना बोलावून वातावरण निवळण्यात आलंय.

खतांच्या वाढत्या किंमती विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे उद्या ताली थाली बजाव आंदोलन

एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी पुरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे. केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून उद्या 20 तारखेला राज्यमंत्री बच्चू कडू हे ताली बजाव-थाळी बजाओ आंदोलन करणार आहे. रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

उजनी पाणी रद्द केल्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत, शेतकऱ्यांनी चंद्रभागेच्या पाण्याने केला विठुरायाला अभिषेक 

उजनी धरणातून इंदापूर साठी 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषामुळे रद्द करण्यात आला. आज शेतकऱ्यांनी चंद्रभागेचे पाणी कावडी मधून आणून नामदेव पायारीसमोर विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक घालत आनंद साजरा केला . तर या प्रश्नावर रान उठवत रक्तरंजित आंदोलनाचा इशारा देणारे सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खा विनायक राऊत यांचे आभार मानले . दुष्काळी सोलापूर जिल्हा मुख्यमंत्र्यांचे ऋण कायम स्मरणात ठेवेल असे त्यांनी सांगितले . 

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 21 मे ला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचीही तारीख 21 मे अशी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही 21 तारीखला सिंधुदुर्ग दौऱ्यावर असतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात चक्रीवादळात झालेल्या ठिकाणी जाऊन पहाणी करून मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांदिवली स्थानकाजवळ एका लोकलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक थांबली होती. या गाडीचा पेंटाग्राफ बंद पडला होता, त्यामुळे मुंबईकडे येणारी जलद मार्गावरील वाहतूक रखडली होती. आता देखील वाहतूक विस्कळीत आहे.

पेट्रोल-डिझेल आणि खतांच्या किंमतीत वाढ, शहापुरात केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

सर्वसामान्य कोरोनाच्या दहशतीखाली असताना भाजपा शासित केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल तसेच खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहापुरात निषेध मोर्चा काढला . शहापूर विश्रामगृह ते तहसीलदार कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण देश कोरोना महामारी च्या दहशतीखाली आहे, असे असताना केंद्र सरकार शेती हंगामात पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता खतांच्या किमती सातशे ते आठशे रुपयांनी वाढवले असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहापुरात निषेध मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात आमदार दौलत दरोडा व जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे तसेच कार्यकर्ता सहभागी झाले होते


 


 

उजनीच्या पाण्यासंबंधित राज्य सरकारच्या नि्र्णयाविरोधात इंदापुरमध्ये आंदोलन

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांनी इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापुर हायवेवर टायर जाळत रस्ता रोको केला. सुमारे 15 ते 20 मिनिटं आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून धरला होता. उजनी धरणातून मिळणाऱ्या 5 टीएमसी पाण्यामुळे इंदापूर तालुक्यातील 22 दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार होता. परंतु सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या विरोधामुळे सरकारने निर्णय रद्द केल्याने आक्रमक आंदोलकांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात, तीन दिवसानंतर लसीकरण सुरु

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तीन दिवसानंतर लसीकरण सुरु होत असल्याने, गर्दी होण्याची शक्यता होती. म्हणून पोलिसांच्या निगराणीखाली हे लसीकरण पार पडतंय. नव्या नियमानुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 ते 122 दिवसांनी दिला जाणार आहे. त्यामुळे आज केवळ 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा केवळ पहिला डोस दिला जातोय. तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस दिला जातोय. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्यांना देण्याच्या सूचना आहेत. 

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. बोर्डांसह केंद्र आणि राज्य सरकार सादर आपली भूमिका हायकोर्टात मांडणार आहे. प्रत्येक बोर्ड आपलं वेगळं सूत्र वापरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आणि भ्रष्टाचार टाळण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

पाच कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले

पाच कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्ध लसींबाबत हे टेंडर आहे. यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारने लस आयतीला परवानगी दिल्यानंतर राज्याने ग्लोबल टेंडर काढले आहे. लस उत्पादक किती लसी देणार, त्या किती दिवसात देणार आणि दर काय असतील याबाबत राज्य सरकार निविदा काढणार आहे. या आधी मुंबई महापालिकेने देखील अशा पद्धतीने निविदा काढली आहे. परंतु त्याला अद्याप कोणत्याही कंपन्यांनी प्रतिसाद न मिळाल्याने आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच लहान मुलांना धोका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असून, 20 टक्के मुलांना आतापर्यंत याची लागण झाली आहे. लक्षणं नसलणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त. आयसीएमआरच्या अभ्यासातून माहिती उघड 

म्युकरमायकोसिस च्या 38 रुग्णांवर लातूर जिल्ह्यात उपचार सुरु

म्युकरमायकोसिस च्या 38 रुग्णांवर लातूर जिल्ह्यात उपचार सुरु आहे. खासगी रुग्णालयात 31 तर सरकारी रुग्णालयात सात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या एकीकडे कमी होत असतानाच म्युकरमायकोसिसच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. प्रशासन याकडे लक्ष देवून आहे. या रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषध आणि इंजेक्शन चा तुटवडा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या रुग्णांसाठी लागणारे इंजेक्शन विना परवानगी परस्पर विक्री करता येणार नाही त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असेल.

मुंबईतलं लसीकरण आजपासून पुन्हा सुरु, बीकेसीतील जम्बो कोविड लसीकरण केंद्रात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100 डोस देणार

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं स्थगित केलेलं मुंबईतलं लसीकरण आजपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतलं सर्वात मोठं लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्रात सकाळी 10 नंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100 डोस दिले जाणार आहेत. ज्यात पहिला डोस घेणाऱ्यांसाठी कोविशील्ड ही लस उपलब्ध असेल. मुंबईतील पालिकेच्या इतर लसीकरण केंद्रांवरही थोड्याफार याच प्रमाणात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांसंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला जाणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्ता आरोपांसंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भिमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईतल्या कोकण भवन येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात जबाब नोंदवला जाणार आहे. घाडगे मुंबईत पोहोचलेत. घाडगे सध्या अकोल्यात जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत. घाडगे यांच्या तक्रारीवरूनच परमबीर सिंग यांच्यासह 33 वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात अकोल्यातील सीटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांत अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कलमांचाही समावेश करण्यात आला आहे.घाडगेंच्या आजच्या जबाबानंतर परमबीर सिंग यांच्याभोवतीचे फास आणखी आवळले जाण्याची शक्यता. आजच्या जबाबात घाडगे परमबीर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती आणि दस्तावेज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यावर्षी बियाण्याची उगम क्षमता तपासूनच पेरणी करा , तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला.

कोरोना , लॉकडाऊनमुळे यावर्षी शेतकरी आर्थिकदृष्टय़ा चांगलाच मेटाकुटीला आलेला आहे . यावेळी खाद्यतेलाचे भाव चांगलेच वाढल्याने तेलबियाला चांगली मागणी आहे त्यामुळे सोयाबीन पिकाला यावर्षी विक्रमी असा 7800 रु प्रति क्विंटलचा भाव मिळत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा जास्त कल हा तेलबिया किंवा सोयाबीन पेरणीकडे आहे. यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बघता बियाणे विकत घेऊन पेरणी करणे जड जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेलं बियाण्याची उगम क्षमता घरीच तपासून पेरणी करावी जेणेकरून दुबार पेरणी करण्याची वेळ येणार नाही असं आवाहन आता अनेक कृषी तज्ञ करत आहेत. पेरणीला अजून एक महिना वेळ असून शेतकऱयांनी आतापासून बियाण्याची उगम क्षमता तपासावी जर 70 टक्क्यांपेशा जास्त उगम क्षमता असेल असच बियाणे पेरणीसाठी निवडण्यात यावं अस अवाहन करण्यात येतंय.

देवेंद्र फडणवीस यांचा आज रायगड दौरा

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आज रायगड दौरा आहे. ते दुपारी 3.00 वाजता अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी सोबत बैठक घेतील. त्यानंतर ते रोहा इथे वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. 

केंद्र सरकारविरोधातील आंदोलन कोल्हापुरातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या अंगलट, बंदी आदेश आणि कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणं कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आलं आहे. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर.के.पवार यांच्यासह 18 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदी आदेश आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे. खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (17 मे) आंदोलन केलं होतं. शहरातील शिवाजी चौकात एकत्र येत पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली होती.

भारतीय बँकांच्या याचिकेवर लंडन कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय =

भारतीय बँकांच्या याचिकेवर लंडन कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय ; विजय मल्ल्यांकडून कर्ज वसुलीचा भारतीय बँकांचा मार्ग मोकळा, मल्ल्यांच्या संपत्तीवरील सिक्युरिटी कव्हर लंडन कोर्टाने हटवलं

अमरावती जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद, लसींचा साठा शिल्लक नसल्यानं लसीकरणाला ब्रेक

अमरावती : अमरावती जिल्ह्यात लसींचा तुटवडा अजूनही कायम असून तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद असणार आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आयसीयूमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं 4 व्हेंटिलेटर बंद, वेळीच प्रकार लक्षात आल्यानं अनर्थ टळला

नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात मोठा अनर्थ टळला आहे. नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील आयसीयूमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं 4 व्हेंटिलेटर अचानक बंद पडले. वेळीच डॉक्टर आणि स्टाफच्या हा प्रकार लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात आला. 

पालघर जिल्ह्यातील अनेक तालुके अजूनही अंधारात, ग्रामीण भागातील वीजपुरवठा आज सुरळीत होण्याची शक्यता कमीच

तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्याने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा, जव्हार, विक्रमगड हे तालुके अजूनही अंधारात आहेत. मुख्य शहरांतील वीज पुरवठा सुरळीत होण्यात आजचा दिवस लागेल तर ग्रामीण भागात आजही वीज सुरळीत होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळत आहे.

जालन्यात स्मशानभूमीत कारच्या हेडलाईटमध्ये अंत्यविधी

जालन्यात स्मशानभूमीत कारची हेडलाईट लावून कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मंगळवारी (18 मे) संध्याकाळी शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये निवृत्त सैनिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान स्मशानात अंत्यविधीसाठी आलेल्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि मृताच्या नातेवाईकांना अंधारात चाचपडावं लागलं. यावेळी कारच्या हेडलाईटच्या सहाय्याने अंत्यविधी करावा लागला. दरम्यान 947 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही महापालिकेला आजवर स्मशानभूमीत साधा लाईट लावण्याची गरज कशी वाटली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पार्श्वभूमी

दिलासा...! राज्यात आज 52,898 रुग्ण बरे होऊन घरी तर 28, 439 नवीन रुग्णांचे निदान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. मंगळवारी 52,898 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर  28,438 नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत एकूण 49, 27, 480 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.69% एवढे झाले आहे. राज्यात मंगळवारी 679 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,15, 88, 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,33, 506 (17.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 30, 97, 161 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत, सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
देश सध्या कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या कचाट्यात सापडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनामुळे दररोज 4 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामुळेच लसीची मागणीही वाढत आहे. अनेक राज्य सरकार लस नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ, अदर पूनावाला यांनी एक निवेदन जारी केले आहे की, "भारत हा एक मोठा लोकसंख्या असलेला देश आहे आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला 2-3 महिन्यांत लसीकरण करणे शक्य नाही. सोबतच आम्ही भारतीयांसाठी असलेल्या लसी निर्यात केल्या नाहीत." संपूर्ण भारताचं लसीकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आश्वासनही सीरम इन्स्टिट्यूटने दिलं आहे.


'कोवॅक्सिन'च्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला 10-12 दिवसात सुरुवात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, तोच तिसऱ्या लाटेची देखील दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका आहे हे देखील सांगितलं जातं आहे. या पार्श्वभूमीवर 'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला  ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय)  मान्यता दिली आहे. येत्या 10-12 दिवसांत क्लिनिकल ट्रायल सुरु होईल, अशी माहिती  निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. ही क्लिनिकल ट्रायल 525 जणांवर होणार आहे. दिल्लीतील एम्स, पाटण्यातील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित समितीच्या शिफारशींनुसार, भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्याआधी दुसऱ्या टप्प्याचा डेटा उपलब्ध करावा लागेल.


उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द, शिवसेना आमदारांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्यासह शिवसेनेच्या तीव्र विरोधाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील आणि माढा विधानसभाचे शिवसेना उमेदवार संजय बाबा कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. उजनी पाणी संघर्ष समितीनेही या निर्णयाचे स्वागत केले असून जिल्ह्यातील आमदारांच्या दारात सुरु केलेले  हलगीनाद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना बारामतीकरांनी उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांना काढायला लावला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.