Breaking News LIVE : परभणीत पुन्हा संचारबंदीचे आदेश
Breaking News LIVE Updates, 22 March 2021:
LIVE
Background
राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा राज्यातील कोरोना परिस्थितीबाबतची महत्त्वाची माहिती जनतेला दिली आहे. ट्विट करत त्यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशाराच दिला आहे. दर दिवशी महाराष्ट्रात नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे काही अंशी वाढतानाच दिसत आहे. अर्थात काही दिवस याला अपवादही ठरत आहेत. दरम्यान, रविवारी एका दिवसात राज्यात तब्बल 30535 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, 11314 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात केली. आतापर्यंत राज्यात एकूण 2214867 कोरोना रुग्णांनी या संसर्गावर मात करण्यात यश मिळवलं आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या दाव्याबाबत शंका; महत्वाची कागदपत्रे 'एबीपी माझा'च्या हाती
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमध्ये परमबीर सिंग यांनी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना आपल्या निवासस्थानी बोलवल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र, या संदर्भातील काही रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती लागले असून माजी पोलीस आयुक्त यांच्या पत्रातील दाव्याबाबत आता शंका उपस्थित होत आहे.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही : जयंत पाटील
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला आहे.
चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या बोराडे लॉनवर पोलिसांची धाड
चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या बोराडे लॉनवर पोलिसांची धाड. साथरोग कायदा धाब्यावर बसवून केली जात होती पार्टी, स्थानिक गुन्हे शाखेने 2 आयोजकांविरोधात दाखल केला गुन्हा, पार्टीतील डीजे व अन्य साहित्याची केली जप्ती, एकूण 40 मुले-मुली होती पार्टीत सहभागी, ही एक बॅचलर्स पार्टी असल्याची प्राथमिक माहिती, दारु-ड्रग्जचा वापर यासंदर्भात आयोजकांकडून केली जात आहे विचारपूस, रामनगर पोलिस करत आहेत प्रकरणाचा अधिक तपास
..तर खासदारकीचा राजीनामा द्या : रुपाली चाकणखर
नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा, कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे : रुपाली चाकणखर
पोलीस ठाण्यातील भंगार विक्री प्रकरणात महिला कर्मचारी निलंबित
वसई पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचे भाग काढून एकूण 10 ते 12 टन भंगार विक्री विना परवानगी करण्यात आली होती. विक्री मात्र हे भंगार एक एक करून वाहनात नेताना वसई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांच्या निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या बाबत वसई पोलिसांतर्फे खात्याअंतर्गत तपास सुरु होता. तपासादरम्यान दोषी आढळल्याने वसई पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून मंगल गायकवाड या महिला कर्मचाऱ्यावर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. मंगल या वसई पोलीस ठाण्यात मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांची 2012 साली बदली झाली होती मात्र त्याला स्थगिती दिल्यामुळे त्या वसई पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत. भंगार विक्री केलेला मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांनी सांगितले.
आज दिवसभरात रायगड जिल्ह्यात ४०० कोरोनाबधित रुग्णांची नोंद
आज दिवसभरात रायगड जिल्ह्यात ४०० कोरोनाबधित रुग्णांची नोंद, पनवेल तालुक्यात सर्वाधिक ३४५ रुग्णांची नोंद, खालापूर येथे १३, पेण १०, कर्जत ११ रुग्ण आढळले
परभणीत पुन्हा संचारबंदीचे आदेश
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. जिल्ह्यात 24 मार्च सायंकाळी 7 ते 31 मार्च च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी. 6 दिवस परभणी जिल्ह्यात संचारबंदी