Breaking News LIVE : पोस्ट कोव्हिडमुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोराडे यांचे निधन
Breaking News LIVE Updates, 08 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदींना भेटणार
मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी वाजता भेटणार असून या क्रायक्रमाची रुपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणसंदर्भातील बैठकीला शिष्ठमंडळासोबत मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.
PM Modi Speech Highlights: 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केलीआहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.
देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वतः लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
पोस्ट कोव्हिडमुळे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोराडे यांचे निधन
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल वैजिनाथ बोराडे (वय 36, रा. विजय देशमुख नगर, विजापूर रोड सोलापूर) यांचे निधन झाले. कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने निधन झाले. त्यांना कोरोना झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, कोरोनानंतर फुफ्फुसातील संसर्ग वाढल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फौजदार राहुल बोराडे हे काही महिन्यापुर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
बैठकीसाठी इतर 10, 12 विषयांबरोबर मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावण्यासाठी नेला होता- विनायक मेटे
मराठा आरक्षण प्रश्नावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असं म्हणता येणार नाही. त्यांनी इतर 10, 12 विषयांबरोबर मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावण्यासाठी नेला होता. पुनर्विचार याचिका केंद्राने आरक्षण रद्द झाल्यानंतर केवळ 3 दिवसांत दाखल केली होती. यांनी आद्यप याचिका दाखल केली नाही. अजून हे परवानगी घेण्यातच अडकले आहेत. माझ्या माहितीनुसार केंद्राची पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.- विनायक मेटे
मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये- विनोद पाटील
काल पासून राज्यात चित्र रंगवलं गेलं की भेट फक्त मराठा आरक्षण साठी आहे,मात्र अस काही घडलं नाही आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली. आम्हाला वाटलं आज जबाबदारी निश्चित होईल, केंद्र किंवा राज्य मात्र असं काहीच झालं नाही, अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता आरक्षणाचा. साधं आश्वासन सुदधा मिळालं नाही यामुळं नाराजी व्यक्त करत मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये ही बाब विनोद पाटील यांनी स्पष्ट केली.
खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द
खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द; माजी सेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर निकाल
खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं, मुंबई हायकोर्टाचे ताशेरे
अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.