Breaking News LIVE : दिल्लीमध्ये बर्ड फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Breaking News LIVE Updates, 21 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jul 2021 04:44 PM
सलग चार दिवस बंद असलेले पुण्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण गुरुवारी सुरु होणार

सलग चार दिवस बंद असलेले पुण्यातील सरकारी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण गुरुवारी सुरु होणार आहे. कोविशील्ड लस पुण्यातील 185 लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या प्रत्येक केंद्रावर कोविशील्ड लसीचे 100 डोस उपलब्ध असतील. तर कोवॅक्सिन लस शहरातील सहा केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक केंद्रांवर लसीचे तीनशे डोस देण्यात येणार आहेत. 

इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट तांत्रिक कारणास्तव बंद, बोर्डची माहिती

इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाइन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याच बोर्डकडून सांगण्यात आलंय. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल तसेच परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. 20 जुलै सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते 26 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र काल पासून संकेतस्थळावर अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी बोर्डाला प्राप्त झाल्यानंतर अखेर बोर्डाने हे संकेतस्थळ काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक अडचण दुरुस्त झाल्यानंतर हेच संकेत स्थळ पुन्हा पूर्ववत होईल विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. 

रायगड - अलिबाग येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेणारा कैदी पळाला

रायगड - अलिबाग येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेणारा कैदी पळाला, कोविड सेंटरमधील खिडकीचे गज कापून कैद्याचे पलायन, अलिबाग येथील नेहुली कोविड सेंटरमध्ये घेत होता उपचार

Corona Update : राज्यात आज 8159 नव्या रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्णांना डिस्चार्ज

Corona Update : राज्यात आज 8159 नव्या रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्णांना डिस्चार्ज, राज्यात सध्या 94745 रुग्णांवर उपचार सुरु

दिल्लीमध्ये बर्ड फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क

दिल्लीमध्ये बर्ड फ्लू रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर अधिक काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

चेंबुरच्या भारत नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेत 19 जणांनी गमावला जीव

मुंबई : चेंबुरच्या भारत नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेत 19 जणांना आपला जीव गमावावा लागला. अनेक जण जखमी आणि बेघर झाले आहेत. सरकारने त्यांना मदतीची घोषणाही केली आहे. मात्र त्या आधी या अपघातग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत म्हणून काँग्रेसने मदतीचा हात देऊ केला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबाला 25 हजार रुपये आणि जखमींना 15 हजार रुपये प्रत्येकी देण्यात आले. त्याच बरोबर बेघर झालेल्या कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी या दुर्घटनेत मृत पावलेल्याना मुंबई काँग्रेस तर्फे श्रद्धांजलीही वाहण्यात आली. यावेळी चंद्रकांत हंडोरे यांनी सरकारने जाहीर केलेली मदत ही या कुटुंबांना लवकरात लवकर मिळावी आणि इथल्या बेघरांना कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे केली आहे.

दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार 

दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार ..


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त


मुंबईसाठी आज रेड अलर्ट, तर उद्यासाठी आॅरेंज अलर्ट ((म्हणजे आज २४ तासात काही ठिकाणी २१० मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज तर उद्या १००-२०० मिमी पावसाचे प्रमाण राहणार))


वारे वेगाने वाहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा..


महाराष्ट्रातील बंदरांना सतर्कतेचा इशारा ..


मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा, कोल्हापुरातल्या घाट क्षेत्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज ..


विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस ..


नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस अपेक्षित..


मराठवाड्यात देखील पुढील ३ दिवस पावसाची शक्यता, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होणार

आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जुलै रोजी खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाईन पध्दतीने  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या  भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे गोपीचंद पडळकर निमंत्रक होते. 

दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईटचा खेळखंडोबा, आता अकरावी सीईटीसाठी अर्ज दाखल करण्यासाठीही वेबसाई ओपन होईना

औरंगाबाद : दहावीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईटचा खेळखंडोबा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. आता अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मात्र ज्या वेबसाईटवर हे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, ती वेबसाइट ओपन होत नाही. ओपन झाली तर ती माहिती भरून देखील पुढे जात नाही. त्यामुळे 27 तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज कसे करायचे हा प्रश्न आहे.

कोयना-पाटण परिसरात पाऊसाचा जोर वाढला

सातारा जिल्ह्यातील कोयना-पाटण परिसरात पाऊसाचा जोर वाढला असून पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर धरणाचे दरवाजे दोन फुटाने उघडले आहेत. धरणातून प्रती सेकंद एक हजार 467 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोकुळ पूल पाण्याखाली जात असून त्यामुळे काहीर, हुंबरने, पांडरपाणी, आंबेघर आणि गोकुळ गांचा संपर्क तुटणार आहे. 

औरंगाबाद शहरात गेल्या चार दिवसापासून लसीकरण बंद

औरंगाबाद शहरात गेल्या चार दिवसापासून लसीकरण बंद आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारकडे विनंती करूनही एकही लस उपलब्ध होऊ शकली नसल्यामुळे रविवारपासून लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आता हे लसीकरण कधी सुरू होईल याचे उत्तर महानगरपालिकेकडे नाही. औरंगाबाद शहरामध्ये आतापर्यंत जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण झालेला आहे. उर्वरित नागरिकांचे लसीकरण कधी पूर्ण करायचं आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड कसे द्यायचे असा प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे. 

तीनही कृषी विधेयक संदर्भात आज सर्व वृत्तपत्रांमध्ये विधिमंडळाची जाहिरात

राज्याच्या तीनही कृषी विधेयक संदर्भात आज सर्व वृत्तपत्रांमध्ये विधिमंडळाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या विधेयकासंदर्भात जनतेचे अभिप्राय मागवण्यासाठी सर्व वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनतेचे अभिप्राय स्वीकारले जातील. या अभिप्राय नंतर या विधेयकामध्ये बदल करून कायदा पास केला जाणार आहेत. तीनही विधेयके पावसाळी अधिवेशनात जनतेच्या अभिप्रायासाठी सभागृहात मांडले होते. त्यानंतर आजपासून दोन महिने जनतेच्या अभिप्राय साठी हे विधेयक ठेवण्यात आलं आहे.

चाकण औद्योगिक वसाहत परिसरात भांबोली फाटा येथे हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट

चाकण : चाकण औद्योगिक वसाहत परिसरात भांबोली फाटा येथे हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, स्फोटात ATM सह समोरील काचांचा चक्काचुर, चोरीच्या उद्देशाने हा स्फोट घडवला असल्याचा पोलिसांचा अंदाज, सुदैवाने ह्या स्फोटात कुठलीही जीवितहानी नाही, महाळुंगे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल.

ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवाराने केंद्रावर खटला भरावा: संजय राऊत

केंद्र सरकार  म्हणतंय ऑक्सिजन अभावी एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, ऑक्सिजन अभावी  मृत  झालेल्या व्यक्तींच्या परिवाराने केंद्र सरकारवर खटला दाखल करावा असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ऑक्सिजन अभावी देशात  शेकडो लोकांचा मृत्यू झाला हे सत्य आहे असंही ते म्हणाले. 

कोयना महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस

कोयना महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या चोवीस तासात कोयनेत 109 मिली मीटर तर नवजा परिसरात 148 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरातही 140 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात प्रती सेकंदाला 32 हजार 200 क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर पाणी आले असून या रस्त्यावरची वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. 

केंद्र सरकारकडून डाळींच्या साठ्यावरील निर्बंध मागे

केंद्र सरकारकडून डाळींच्या साठ्यावरील निर्बंध मागे घेण्यात आले असून साठवणूकीची मर्यादा आता फक्त तूर, उडीद, चणा, मसूर डाळींसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. संबंधितांना डाळींचा साठा ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर जाहीर करावा लागणार आहे. 


मालेगावमध्ये बकरी ईद घरातच साजरी करण्याचं प्रशासनाचं आवाहन

Bakri-Eid 2021 : राज्यभरात आज बकरी ईद मोठ्या उत्सहात साजरी होत आहे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे मालेगावमध्ये बकरी ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आल्याने दरवर्षी मुख्य ईदगाह मैदानावर होणारी सामूहिक नमाज पठणाची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे. ईदगाह मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

भिवंडी : भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. तर भिवंडी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर जर कायम राहिला तर परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बुलढाणा : पावसाची सर्वदूर हजेरी, शेतीच्या कामांना वेग

बुलढाणा : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगली कृपा दृष्टी दाखविली असून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार तर काही भागांत दमदार पाऊस सुरु आहे. काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. तर जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, मेहकर, सिंदखेडराजा या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी शेतातील पिके पाण्याखाली असून पेरणी नंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतीची मात्र सर्वच कामे शेतकऱ्यांनी आटोपली आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.

जलयुक्त शिवारच्या चुकीच्या कामांचा शेतीला मोठा फटका; कंत्राटदारावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची परभणीतील शेतकऱ्यांची मागणी

परभणी : परभणीच्या इंद्रायणी नदीवर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या चुकीच्या कामांमुळे मागच्या 6 वर्षांपासून काही गावांना मोठा फटका बसतोय, त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करून शेतीचे नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी स्थानिक गावकऱ्यांनी ओढ्याच्या पाण्यात अर्धनग्न बसुन आंदोलन केले आहे.


इंद्रायणी नदीवर 2016-17 साली जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पुनरुजीवन प्रकल्प राबवण्यात आला. नदीच्या पात्रावर भराव टाकून नदीचा मूळ नैसर्गिक प्रवाह तीन भागात विभागाला गेला ज्यामुळे वडगाव सुक्रे, इंदेवाडी, भारस्वाडा, आदी गावांच्या परिसरातील शेतीचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने स्थानिक गावकऱ्यांनी ओढ्यात साचलेल्या पाण्यात अर्धनग्न बसुन आंदोलन केले आहे. 

आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी कायम राहणार आहे. तर आज आणि उद्या रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आलाय.. पुणे, सातारा, कोल्हापुरातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.. आज मुंबई, ठाण्याला आॅरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट देण्यात आलाय... मराठवाड्यात मध्यम तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदवर कोरोनाचं सावट, निमय पाळून नमाज अदा करण्याचं आवाहन

आज देशभरात बकरी ईद साजरी केली जातीये. मात्र सलग दुसऱ्या वर्षी ईदवर कोरोनाचं सावट कायम आहे. त्यामुळे देशभरात साधेपणाने ईद साजरी केली जातीये. बकरी ईदकरिता मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केलीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मैदानावर होणारी सामुदायिक नमाज पठाणाला प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलीये. रमजाननंतर बकरी ईद हा सर्वात मोठा सण मानला जातो. तरी, आज देशातील महत्वाच्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण केलं जातंय.

कल्याण डोंबिवलीत आज लसीकरण बंद राहणार

लसींच्या पुरेशा साठ्याअभावी कल्याण डोंबिवलीतही आज लसीकरण बंद राहणार आहे.या शहरात लसीकरण केंद्र कधी तरी सुरू, पण बऱ्याचदा बंद अशी अवस्था झाली आहे. कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी महापालिकेची 25 केंद्रं आहेत. लसींचा साठा प्राप्त न झाल्यामुळं आजही सारी केंद्र बंद ठेवायची वेळ आली आहे. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत चार लाख 40 हजार 541 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

नाशिक शहरातील शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना लसीचा पहिला डोस मिळणार नाही

आज सलग नवव्या दिवशी नाशिक शहरातील शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळणार नाहीये. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लसीकरण सुरळीत सुरु असून अनेक रुग्णालयात तर स्फुटनिक लसही आली आहे..

कोल्हापुरातील 17 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर शहरात रिमझिम सरी सुरु आहेत मात्र ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडतोय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 28.10 इंच इतकी पोहचली असून जिल्ह्यातील 17 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत.


 

दिल्लीतील AIIMSमध्ये बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू, संपर्कात आलेले नर्स, डॉक्टर्स आयसोलेशनमध्ये

कोरोना संकटात देशात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. आणि आता या बर्ड फ्लूनं मानवाच्या शरीरात शिरकाव केलाय की काय अशी भीती निर्माण झालेय. कारण आत्तापर्यंत फक्त पक्षांचा जीव घेणारा बर्ड फ्लू माणसाच्या जीवावर उठलाय. बर्ड फ्लूमुळे देशात पहिला मृत्यू झालाय. बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या ११ वर्षीय मुलाचा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झालाय. या मुलाला २ जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याला बर्ड फ्लू विषाणूच्या एच ५ एन १ या  व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. यानंतर या मुलाच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील सर्व कर्मचारी विलगीकरणात आहेत. सध्या केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असून अद्याप महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे भीतीचं कारण नसलं तरी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना महाराष्ट्रातील पोल्ट्री चालकांना देण्यात आल्या आहेत.

आज मुंबईत लसीकरण बंद

Coronavirus : कोरोना-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज म्हणजेच, बुधवार दिनांक 21 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे.


लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

पार्श्वभूमी

Bird Flu Death : दिल्लीतील AIIMSमध्ये बर्ड फ्लुमुळे देशातील पहिला मृत्यू, संपर्कात आलेले नर्स, डॉक्टर्स आयसोलेशनमध्ये


Bird Flu Death : कोरोना महामारीची दुसरी लाट अद्याप सुरुच आहे. अशातच यंदा देशात एविएन इन्फ्लुएन्जा H5N1 म्हणजेच, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात 11 वर्षाच्या मुलाचा एवियन इन्फ्लूएंजामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या या मुलाला 2 जुलै रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हरियाणामधील होता. एनसीडीसीच्या एका पथकाला या गावात पाठवण्यात आलं आहे. 


या एविएन इन्फ्लुएन्जा H5N1ची लागण झालेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला देशातील अनेक राज्यांत कोरोनासोबतच बर्ड फ्लूचाही प्रादुर्भाव दिसून आला होता. अनेक ठिकाणी बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कोंबड्या ठार करण्यात आल्या होत्या. 


Pegasus Spyware : फोन टॅप केले नाहीत तर स्पष्टपणे सांगा, सरकार ज्याप्रकारे विषय फिरवतंय, यावरून स्पष्ट होतंय, 'दाल में कुछ काला है' : नवाब मलिक


"भाजप सरकारने पॅगेसेसच्या माध्यमातून जर फोन टॅप केले नाहीत, तर त्यांनी तसं स्पष्टीकरण द्यावं. जर खरेदी केलं असेल तर तसं देखील सांगावं. आणि ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, त्यांनी कोणतं देशविरोधी कृत्य केलं होतं हे देखील स्पष्ट करावं. आम्हाला संशय आहे, ज्या प्रकारे सरकार विषय फिरवत आहे. यावरून स्पष्ट होतं आहे की, दाल में कुछ काला है" आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पॅगेसेस प्रकरणाचा समाचार घेतला. 


याबाबत अधिक माहिती देताना नवाब मलिक म्हणाले की, "पॅगेसेसच्या माध्यमातून पत्रकारांचे फोन हॅक झाले. यामध्ये काही सरकारी व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील फोन हॅक झाले असं समोर येत आहे. आता केंद्राकडून खुलासा होतोय की, कुठलेही फोन हॅक होत नाहीत. प्रश्न असा आहे की, पॅगेसेसकडून हा स्पायवेअर भारत सरकारनं किंवा भारत सरकारच्या एजन्सीने खरेदी केले की नाही. सर्वप्रथम सरकारने याचा खुलासा करावा. जर त्यांनी खरेदी केलं नाही तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगावं. पण सरकार याबाबत स्पष्टपणे सांगत नाही की, आम्ही हॅक केलं नाही. त्याचा अर्थ निघतो की, सरकार किंवा सरकारच्या एजन्सीने खरेदी केलेलं आहे."


India vs Sri Lanka, 2nd ODI: : अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध तीन विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली


टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे. श्रीलंकेने दिलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना एक वेळ अशी होती की भारताची जिंकण्याची आशा मावळली होती. 197 वर 7 गडी बाद असल्यामुळे श्रीलंकेचं पारडं जड होतं. मात्र दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी 84 धावांची अभेद्य पार्टनरशीप केली. 


श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला पृथ्वी शॉ अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेला ईशान किशनही एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनही 29 धावा करुन बाद झाला. शिखर धवननंतर सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडेने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मनिष पांडे 37 धावांवर रनआऊट झाला. मनिषनंतर आलेला हार्दिक पांड्याही खातं न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर अर्धशतक साजरं करुन सूर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने 53 धावा केल्या. आता कृणाल पांड्यावर भारताच्या खेळाची धुरा उरलेली असताना तोही 35 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना गमावला अशी स्थिती असताना दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने जबाबदारीने खेळी करत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची नाबाद खेळी केली. यात दीपक चहरने 69 धावांची आणि भुवनेश्वर कुमारने 19 नाबाद धावांची खेळी केली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.