Breaking News LIVE : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचं डेंग्यूने निधन
Breaking News LIVE Updates, 13 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नगरसेविका अर्चना बारणे या गेल्या आठवड्यापासून आजारी होत्या. शुक्रवारी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लक्षणं अनेक असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्यांचे नमुने घेण्यात आले. तेंव्हा सोमवारी त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. सोबतच कावीळ ही झाल्याचं समोर आलं. दोन्ही पातळ्यांवर उपचार सुरू होते. मात्र काही दिवस आजार अंगावर काढल्याने, शरीर उपचारांना साथ देत नव्हतं. अखेर आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमी वयातच त्या सर्वांना सोडून गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये.
अर्चना बारणे यांनी पहिल्यांदाच 2017ची महापालिका निवडणूक लढवली आणि प्रभाग क्रमांक 23 मधून त्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका झाल्या. स्थायी समितीचं सदस्य पद आणि 'ग' प्रभाग कार्यालयाचं अध्यक्षपद भूषविण्याची संधी ही त्यांना मिळाली. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या काळात ही त्या अनेकांच्या मदतीला धाऊन आल्या. आगामी महापालिका निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने देखील त्यांची मोर्चेबांधणी सुरू होती. पण अशात अर्चना बारणेंना डेंग्यूने मात्र गाठलं. डेंग्यूसोबतच त्यांना कावीळ देखील झाली. याचं निदान होईपर्यंत उशीर झाला आणि त्यांच्या आयुष्याची दोर कापली गेली. अतिशय शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावाच्या त्या होत्या. म्हणूनच त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त केली जातीये.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नवीन नियुक्ती, कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून राहूल रेखावर यांची नियुक्ती
चंद्रपूर : आरपीएफच्या कोठडीत संशयित आरोपीचा मृत्यू. बल्लारपूर येथील आरपीएफच्या चौकीतील घटना, अनिल गणपत मडावी (२९) असं मृतकाचं नाव असून तो विरूर येथील रहिवासी आहे. त्याला विरूर रेल्वे स्टेशनमधील तांब्याची तार चोरल्या प्रकरणी आरपीएफने काल अटक केली होती. आरपीएफच्या कोठडीत असतांना काल संध्याकाळी त्याची प्रकृती बिघडली आणि चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर काल रात्रीच त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी बल्लारपूर पोलीस तपास करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील निफाड जवळच्या नांदूर-माध्यमेशवर जवळील गोदावरी नदीच्या पात्रात पिकअप गाडी पालटुन 2 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले. सिन्नर येथून येवला तालुक्यातील जळगाव-नेऊन येथे वऱ्हाड घेऊन ही पिकअप येत असताना ती नदीच्या पात्र पलटी झाली. घटना घडतात परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले त्यांच्यावर निफाड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
पीजी नीटची तारीख जाहीर! NEET पदव्युत्तर परीक्षा 11 सप्टेंबर 2021 ला घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडावीया यांनी मंगळवारी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उद्यापासून कडक अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्याकडून जारी, 14 जुलैपासून 19 जुलैपर्यंत आदेश अंमलात राहणार, रस्त्यावरील भाजीविक्री, फेरीवाले, खाद्य पदार्थ, चहा टपऱ्या पूर्णपणे बंद होणार, नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर बंधने, लग्न व निधन कार्यक्रमास देखील मोजक्याच लोकांची परवानगी
संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात सर्वत्र कोसळधारा, पुढील ५ दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगल्या पाऊस अपेक्षित, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरीला आता दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभरापूर्वी विरोधात असणाऱ्या राजापूर तालुक्यातील विलेय ग्रामपंचायतीनं आता रिफायनरीच्या पाठिंब्याचा ठराव संमत केला आहे. मासिक सभेत हा ठराव संमत करण्यात आला आहे. त्यानंतर राजापुरच्या तहसिलदारांकडे हा ठराव सुपूर्द देखील करण्यात आला आहे. इतकंच नाही तर ग्रामपंचायतीच्या वतीनं एक पत्र देखील शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ स्थानिक नेते, पदाधिकारी समर्थन करत होते. पण, आता थेट ग्रामपंचायतीकडून रिफायनरीच्या समर्थनार्थ ठराव करण्यात आला आहे. शिवाय विलये दशक्रोशी समर्थन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता रिफायनरी आणि त्यासंदर्भातील वाढता पाठिंबा याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत.
पंढरपूर : आषाढी सोहळा 7 दिवसावर आला असताना पंढरपूर मधील कोरोना रुग्ण वाढू लागले . आज एका दिवसात नवीन 82 रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सर्तक
कल्याण : कल्याण पूर्वेतून कल्याण पश्चिमेला येण्यासाठी किंवा शहाडला जाण्यासाठी तिथल्या नागरिकांना बरीच कसरत करत यावे लागते. मात्र त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी एमएमआरडीए तब्बल 400 कोटी खर्च करून एक एलिव्हेटेड पूलाची निर्मिती करणार आहे. कल्याण-पुणे लिंक रोडवरील विठ्ठलवाडी येथून वालधुनी मार्गे हा पूल थेट कल्याण पश्चिमेच्या शहाडला जोडणाऱ्या भवानी चौकात उतरणार आहे. महापालिकेकडून त्याचा डीपीआर प्रगती पथावर आहे. यासाठी 400 कोटींच्या निधीची गरज असून एमएमआरडीए ने सकारात्मक प्रतिसाद दिलाय. हा पूल तयार झाल्यावर कल्याण पूर्व पश्चिम गाठण्यासाठी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांसोबत एक बैठक घेतली. त्यामध्ये या उड्डाणपूलाला एमएमआरडीए आयुक्तांनी तत्त्वता मंजुरी दिल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचं पत्र, जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणात पत्र, रात्री ईडीकडून बँकेला आला मेल, 15 तारखेपर्यंत माहिती देण्याचे आदेश, ईडीच्या पत्राबाबत चेअरमन तानाजी चोरगे यांचा दुजोरा
एकनाथ खडसेंची चौकशी केलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांनी झोटिंग समिती नेमली होती.
झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती हाती येतेय. भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जून २०१७ मध्येच फडणवीसांकडे सादर करण्यात आला होता. अनेकदा हा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी झाली. पण हा अहवाल सादर करण्यात आला नाही. या झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्य सचिवांना विचारणा केली. त्यावेळी हा अहवाल कुठेच सापडत नसल्याचं अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कळवलंय. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल गेला कुठे? असा सवाल उपस्थित होतोय.
भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे होते. यशपाल शर्मा 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात 6 जणांचा मृत्यू, सर्व मृतक एकाच कुटुंबातील, गॅस गळतीमुळं घटना झाल्याची शक्यता, रमेश लष्करे 40, अजय लष्करे 20, लखन लष्करे 09, कृष्णा 08, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 मृतकांची नावं
नांदेड : काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृष्य मुसळधार पावसाने कंधार तालुक्यातील फुलवळ येथील बिदर-नांदेड राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरु होते. कालच्या अचानक सुरु झालेल्या ढग फुटी सदृश्य मुसळधार पावसाच्या पाण्याने निर्माणाधिन पुल आणि पुलाच्या कामावरील सर्व साहित्य वाहून गेलंय, तर यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
रायगड : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच रविवारी दिवसभर रायगड जिल्ह्यातील मुरूड, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर भागात पावसाने धुवादार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याचदरम्यान, महाड तालुक्यातील विन्हेरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील रेवतळे फाटा येथील रस्त्यावरून पाणी वाहत असताना एसटी चालकाने बस पाण्यातून मार्ग काढत नेली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रेवतळे नजीकच्या या मार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह वाहताना दिसत असून एसटी चालकाने केलेल्या या अतिउत्साहामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, केवळ सुदैवाने ही एसटी बस रस्त्याच्या पलीकडे गेल्याचे दिसत आहे.
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब , 5 लाख रुपयांच्या हिशोब लागत नसल्याची चर्चा , नोटप्रेस मधून नोटा गायब झाल्यानं खळबळ , प्रेसमध्ये चौकशी पूर्ण झाली मात्र 5 लाख रुपये आढळून आले नाही, याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही,500 रुपयांचे 10 बंडल गायब असल्याची सूत्रांची माहिती, कडक सुरक्षाव्यवस्था भेदून 5 लाख रुपये गेले कुठे यंत्रणेला पडला प्रश्न
नाशिक- सोसायटीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करतांना झाला स्फोट, काही मिनिटात बाईकचा झाला कोळसा, सुदैवाने अपार्टमेंट मधील 6 कुटुंबाचे वाचले प्राण,6 वीज मीटर आणि एक बाईकही या आगीत जळून खाक, कालपासून सोसायटीची वीज गायब, इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसीडेंसी मधील कालची घटना , पेट्रोल महागल्याने इलेक्ट्रिक बाईक वापरत असाल तर काळजी घ्या
राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. 31 डिसेंबरआधी 5 हजार 200 पदं भरण्यात येणार आहेत. त्यानंतर सात हजार पदं भरले जातील अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय.
काल दिवसभर झोडपल्यानंतर आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासून कोकणात मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय. वरुणराजाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग आलाय. सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल नदी दुथडी भरुन वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून १६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेल्या एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाची बैठक आयोजित केलीय. मंत्रालयात आज सकाळी 10.15 वाजता ही बैठक होतेय. या बैठकीला सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीबाबत काय निर्णय होतो, याकडे एमपीएससी विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष असेल.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राज्य महामार्गावरील करूळ घाटरस्ता खचल्याने सध्या धोकादायक स्थितीमुळे हा घाटमार्ग प्रशासनाने 26 जुलैपर्यत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता भुईबावडा, फोंडा आणि आंबोली या घाटमार्गाचा वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यात काल पडलेल्या पावसाचा फटका वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटरस्त्याला बसला आहे. करूळ तपासणी नाक्यापासुन तीन ते चार किलोमीटर अतंरावर हा घाटरस्ता खचला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे हा घाटमार्ग आणखी खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटमार्ग वाहतुक धोकादायक असल्याने प्रशासनाने वाहतुकीस बंद केला आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांचे हाल अत्यंत बिकट असून जिंतुर तालुक्यातील पिंप्राळा गावात रस्त्याअभावी रुग्णालयात न पोचल्याने 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मागच्याच आठवड्यात येथील एका महिलेला माळरानावर प्रसूतीची वेळ रस्त्यामुळे आली होती. रस्त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चाही काढला मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.
जिंतुर तालुक्यातील पिंप्राळा गावातील 65 वर्षीय महिला पार्वतीबाई महादु ढाकरे यांना रात्री झोपेत असताना अर्धांगवायुचा झटका आला,पण सतत दोन दिवस सारखा पाऊस सुरु असल्याने गावात गाड़ी येणे कदापी शक्य नव्हते उपचारासाठी उशीर झाला होता.तरीही गावातील खाजगी जीप चालकाने मोठ्या प्रयत्नाने गावातील तरुण मुलांना सोबत घेऊन गाडी चीखलातून तीन किमी बाहेर काढत जिंतूरचा रस्ता धरला.पुढे सुलतानपुर या ठिकाणी खाजगी दवाखाना गाठला परंतु तिथे पोहचण्यासाठी खुप उशीर झाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यु झाला आहे.
पंढरपूर : विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्याच्या आराखड्याबाबत आज अंतिम बैठक होणार असून यात या अंदाजे 40 ते 45 कोटींच्या आराखड्याला अंतिम मान्यता बैठकीत दिली जाईल. आज होणाऱ्या बैठकीस पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाचे आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अंतिम मंजूर केलेला हा आराखडा परवानगीसाठी विधी आणि न्याय विभागाला सादर केला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
पार्श्वभूमी
कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या (मुंबईत कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग यशस्वी) उपचार पद्धतीनं अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. हा प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरला आहे. कारण, हे मिश्रित औषध दिल्यानंतर फक्त एकाच (0.5 टक्के) रुग्णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्यू दरामध्ये तब्बल 70 टक्के घट झाली आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन कमी होवून आता 5 ते 6 दिवसांवर आला आहे.
कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी करण्यात आला आहे. हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.
कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्ये नोव्हेंबर 2020 पासून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्ये अलीकडेच म्हणजे, दिनांक 10 मे 2021 रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation मान्यता दिली आहे.
राज्य मानवाधिकार आयोगावरील रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत
राज्य मानवाधिकार आयोगावरील रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना, "ही शेवटची मुदतवाढ, यानंतर वेळ वाढवून मागू नका" या शब्दांत हायकोर्टानं राज्य सरकारला बजावलं आहे. सोमवारी सरकारी वकील निशा मेहरा यांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगावर नियुक्तसाठी निवडलेल्या नावांची यादीच कोर्टापुढे सादर केली. तसेच दोन महिन्यांत या नियुक्त्या केल्या जातील, अशी हमीही दिली. जी मान्य करत हायकोर्टानं यासंर्भातील याचिकेवरील सुनावणी 13 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
नागरीकांच्या मुलभूत हक्क आणि प्रतिष्ठेचे रक्षण व्यावं, या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या मानवाधिकार आयोगाचं कामकाज सध्या ठप्प झालेलं आहे. याची गंभीर दखल घेत आदेश दिल्यानंतर गेल्या दिडवर्षात आयोगाच्या अध्यक्षांसह अन्य 25 रिक्तपद भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टानं चांगलंच धारेवर धरलं होतं. मुख्य न्यायमूर्ती दीपांकार दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं इतकी वर्ष मानवाधिकार आयोग अध्यक्षांचे पद रिक्त का?, तत्कालीन न्यायमूर्तींनी तीन जणांच्या नावांची शिफारस केली होती. मग निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतो?, असा सवाल करत राज्य सरकारला सोमवारपर्यंत यावर उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देऊ केलेले खावटी अनुदान हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असल्याचे गौरवोद्गार नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत खावटी योजनेच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभाचे. काल (सोमवारी) आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जगभरात सगळ्यांनाच लॉकडाऊन पाळावा लागला. याचा फटका इतर सर्व घटका प्रमाणेच हातावर पोट घेऊन जगणाऱ्या आदिवासी समाजाला देखील बसला, या अवघड काळात राज्यातील आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी 2013 साली बंद करण्यात आलेली खावटी कर्ज योजना अनुदान स्वरूपात सुरु करण्याचा निर्णय या सरकारने घेतला.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि भामरागड या दोन प्रकल्प क्षेत्रातील लाभार्थ्यांना काल (सोमवारी) अनुदान वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी प्रातिनिधीक दोन लाभार्थ्यांची नावे घेवून पालकमंत्री यांचे अनुमतीने खावटी योजनेतील अन्नधान्य कीटचे वितरण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, मंत्री महोदयांच्या सूचनेवरून कीट वाटप करण्याचा मान प्रकल्प कार्यालयातील वर्ग-4 मधील महिला कर्मचाऱ्याला दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार रामदासजी आंबटकर, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवांगरे-वर्मा, व्यवस्थापकीस संचालक नितीन पाटील, प्रकल्प अधिकारी भामरागड शुभम गुप्ता, प्रकल्प अधिकारी अहेरी श्री अंकित, जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर आणि विशेष कार्य अधिकारी सुनिल भजनावळे उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -