राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा, भास्कर जाधवांविरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक, जाधवांचंही चोख प्रत्युत्तर
हेदवतडमधील सभेत खोतकीबाबत केलेल्या विधानावरुन शिवसेना उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नवा संघर्ष सुरु झाला आहे.
Bhaskar Jadhav : हेदवतडमधील सभेत खोतकीबाबत केलेल्या विधानावरुन शिवसेना उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यात नवा संघर्ष सुरु झाला आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा ब्राह्मण समाजाचा भास्कर जाधव यांच्यावर आरोप केला आहे. राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची भास्कर जाधव यांना पत्राद्वारे आठवण करून दिली आहे. ब्राह्मण सहाय्यक संघाच्या पत्राला उद्धव गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला असल्याच्या विधानावर भास्कर जाधव ठाम. मी येण्यापूर्वी गुहागरमध्ये विरोधी पक्ष निवडणूक हरला की त्याच्या घरावर दगड पडायचे हा दहशतवाद आपण गुहागरमध्ये आल्यानंतरच संपल्याची आठवण भास्कर जाधव यांनी करुन दिली.
खोतकीबाबत भास्कर जाधव नेमके काय म्हणाले?
- 1975 पासून राजकीय प्रवास मांडत गुहागरचे भाजपचे तत्कालीन आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीतला प्रचारातील सक्रिय सहभागाची करून दिली आठवण.
- गुहागरच्या इतिहासात पहिल्या पंचायत समिती सभापती ब्राह्मण समाजाची केल्याची करून दिली आठवण.
- पत्र लिहून देणारा अनाजी पंत कोण ? याबाबत केला उल्लेख
भास्कर जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
भास्कर जाधव यांनी गुहागर तालुका ब्राम्हण सहाय्यक संघाचे अध्यक्ष धनशाम जोशी यांनी पत्र लिहलं आहे. यामध्ये भास्कर जाधव यांनी धनशाम जोशी यांच्यावर टीका केली आहे. इतिहासाचे सिंहावलोकन मी जरुरु करतो पण त्य.ात रमणारा कार्यकर्ता मी नाही. वर्तमानाही जात, धर्म, पंथ विरहीत विकास केलेला असल्याचे जाधव म्हणाले. मी फायद्यासाठी पक्षांतरक केलं? पण तुम्ही युतीमध्ये राहुन गद्दारी करणारे गद्दार आहात, अशी टीका जाधव यांनी धनशाम जोशी यांच्यावर केली.
माझे प्रिय मित्र विनूभाऊ मुळे यांचा उल्लेख आपण पत्रामध्ये केला आहात. त्यांच्या पत्नीला मी दोन वेळा गुहागर पंचायत समितीच्या सभापती केलं. गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती होण्याचा बहुमान मी मिळवून दिला. त्याबद्दल एखादे कौतुकाचे पत्र पाठवण्याकरता तुम्हाला लाजच वाटली असावी. तसेच प्रवीण ओक यांचा उल्लेख आपण केलात त्या प्रवीण ओक व त्यांच्या सौभाग्यवती पूर्वा ओक यांना देखील दोन दोन वेळेला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व त्यांना निवडून आणलं. श्रीमती गीता खरे यांना नगरपंचायतीमध्ये निवडून आणून सभापती केलं, हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरलात. त्यामुळे एखाद्या राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो असेल तर त्याचा संपूर्ण समाजाशी संबंध जोडणं हे तुमच्यासारखे पाताळयंत्रीच करू शकतात.
निवडणुका जिंकणं हे मी माझं कर्तव्यच समजतो
मी राजकारणात आहे म्हणजे निवडणुका जिंकणं हे मी माझं कर्तव्यच समजतो, मी काय आश्रमशाळा नाही चालवत. 2007 साली मी गुहागरमध्ये काम करायला सुरुवात केली, भोळ्या-भाबड्या जनतेचा त्रास व दुःख डोळ्याने पाहिले. लेखणीचा दहशतवाद पाहिला. या जाचातून मुक्त होण्यासाठी ते एका आश्वासक नेतृत्वाची वाट पाहत होते आणि माझ्या रुपात त्यांनी ते पाहिले ही का माझी चूक? कामाने आणि संपर्काने मला हरवता येत नाही म्हणून
आपल्यासारख्या अनेक महानुभवांनी मला बदनाम करण्यासाठी वारंवार षड्यंत्र
रचली, जाती-पातीच विष या तालुक्यात कालविण्याचे काम केले गेले.
हेदवतड येथील भाषणात मी कुठेही ब्राह्मण या शब्दाचा किंवा जातीचा उल्लेखही केला नव्हता. प्रत्येक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे वेगवेगळ्या जातीचे, समाजाचे असतातच. परंतु, माझ्या एका वाक्याचा संबंध तुम्ही समाजाशी जोडलात. तर मग तुम्ही पत्र काढून मराठा समाजाबद्दल, माझ्याबद्दल जे लिहिले आहे ते मराठा समाजात जाऊन मी सांगावं का? असा सवालही त्यांनी केला.























