कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत या प्रश्नाला उत्तर देताना महाविकास आघाडीमध्ये सर्व व्यवस्थित सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुंबई : कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाविषयी उद्धव ठाकरे म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्याकडे याविषयी काही माहिती असेल किंवा काही पुरावे असतील त्यांनी मुंबई पोलिसांना येऊन द्यावे. महाराष्ट्र पोलिस हे प्रकरण हातळण्यास सक्षम आहे. ज्यांचा महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर विश्वास नाही त्यांना पोलिसांवर आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही. याच पोलिसांच्या आधारावर माजी मुख्यमंत्र्यांनी पाच वर्ष सत्ता केली होती,हे विसरू नये.
महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत. आमचं नातं टिकेल नाही टिकेल याची कुणी परवा करु नये. भाजपासोबत आमचा घटस्फोट झाला. त्याची कारणं सगळ्यांना माहिती आहेत. शिवसेना 30 वर्ष भाजपासोबत होती. त्यावेळी त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. मात्र आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याविरोधात एवढी वर्ष लढलो त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. महाविकास आघाडीचं सरकारला कोणताही धोका नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संबंधित बातम्या :राज्य सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात, हेच समजत नाही : देवेंद्र फडणवीस
Majha Maharashta Majha Vision | हे सरकार म्हणजे, लिव्ह-इन रिलेशनशिप : देवेंद्र फडणवीस