मराठा आंदोलनाला पाठिंब्यासाठी भाजपच्या पंचायत समितीच्या सदस्याचा राजीनामा
मराठा समाजाच्या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी लातुरच्या औसा तालुक्यातील भाजपचे लोदगा गणा पंचायत समितीचे सदस्य जनार्दन कास्ते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
लातूर : मराठा समाजाच्या आंदोलनवरुन भाजपमध्येही नाराजी सत्र सुरू झालं आहे. मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी भाजपमध्ये पडली आहे. भाजपचे पंचायत समितीचे सदस्य जनार्दन कास्ते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कास्ते लातूरच्या औसा पंचायत समितीच्या लोदगा गणाचे सदस्य होते.
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल किंवा नाही, याची मला माहिती नाही. मात्र मराठा समाजाच्या आंदोलनाला माझ्या राजीनाम्यामुळे एक संदेश मिळेल आणि याचं मला समाधान आहे, असं मत कास्ते यांनी व्यक्त केलं.
मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींकडून आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी सेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही राजीनामा दिला. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं.
आरक्षणाची मागणी करत मराठा समाज राज्यभर आंदोलन करत आहे. या आंदोलनात पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं.
काल (24 जुलै) आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला इशारा दिला होता की, उद्यापर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देईन. अखेर आपल्या इशाऱ्याला जागत हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
संबधित बातम्या