(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मैदानात हरायचं आणि शेमड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं, नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. आम्ही घाबरत नाही. मात्र कायदेशीर उत्तर नोटीसीला देणार आहोत, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
Nitesh Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई महानगर पालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर राणे कुटुंबीयांकडून पहिलीच प्रतिक्रीया समोर आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. आम्ही घाबरत नाही. मात्र कायदेशीर उत्तर नोटीसीला देणार आहोत, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने सर्व पाहतेय. राणे कुटुंबीय असो , किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे करत आगेच. हे खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाहीत. मैदानात हरायचं आणि शेमड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं, याला काहीच अर्थ नाही. त्यांना ज्या ज्या प्रकारे लढायचं आहे ते येऊदे अंगावर, आम्ही घाबरत नाही. मात्र कायदेशीर उत्तर नोटीसीला देणार आहोत, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
यावेळी नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवरही निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घाम पुसत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजे. कितीही आव आणला तरी घाबरलेला माणूस कसा दिसतो, हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्यासाठी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ ट्वीट केला आहे.’ शुक्रवारी आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर तज्ञ संचालक म्हणून निवड झाली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक निवडीत अनपेक्षित धक्कातंत्र, जिल्हा बँकेच्या राजकारणात नवीन ट्विस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची होती. निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद बाजी मारली होती. जिल्हा बँक अध्यक्ष पदावर संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आलेले नितेश राणेंचे समर्थक मनिष दळवी यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून निश्चित करण्यात आले होते. शुक्रवारी जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नितेश राणेंची निवड करण्यात आली. दोन महीन्यापुर्वी आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँक निवडणुकीत मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा बँकेचे मतदार असलेले संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधार म्हणून आमदार नितेश राणेंचे नाव आल्यामुळे ही निवडणूक गाजली होती. मात्र आमदार नितेश राणे या संपूर्ण निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत होते आणि आता आमदार नितेश राणे स्वतः जिल्हा बँकेत स्वीकृत संचालकपदी निवड झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात एक वेगळे ट्विस्ट निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या आजच्या बैठकीत आमदार नितेश राणे जिल्हा बँकेत उपस्थित होते. यावेळी त्यांची स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली.