(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारने शिक्षकांना पुन्हा त्रासात ढकलू नये, ऑनलाईन बदल्या रद्द होण्याच्या शक्यतेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली महाविकास आघाडी सरकारने सुरु केल्या आहे. हे अधिकार जिल्हा परिषदेकडे पुन्हा देण्याची शक्यता आहे. यावर पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बीड : भाजप सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय महाविकास आघाडीने बदलण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण अवलंबले होते. मात्र आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच हे धोरण बदलून बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदांकडे सोपवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त करत, शिक्षकांना पुन्हा त्रासात ढकलू नका असं आवाहन केलं आहे.
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट
"शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या हा विषय, डायरेक्ट जनतेतून सरपंच, जलयुक्त शिवार सारखा महत्वाचा आणि लोकप्रिय आहे. जो गरीब आहे, ज्याचा वशिला नाही, त्याला ही अधिकार असावेत. यासारखे निर्णय रद्द करण्यापेक्षा सर्व विभागांनी त्यांना रेप्लिकेट (अनुकरण) करावे. विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना कायमचं त्रासातून मुक्त केले आहे, त्यांना परत यात सरकारने ढकलू नये."
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या निर्णयासंदर्भात ग्रामविकास विभागाने अभ्यासगट नेमला आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे नवे धोरण ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. पुणे, रायगड, चंद्रपूर, नंदूरबार आणि उस्मानाबादचे सीईओ सदस्य नव्या अभ्यासगटात आहेत. हा अभ्यासगट 11 फेबुवारीला सरकारला आपला अहवाल सादर करेल. 27 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार बदलीचे सर्व अधिकार ग्रामविकास मंत्रालयाकडे एकवटले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्त करण्याला विरोध केला आहे. बदल्या ऑनलाईनच व्हायला हव्यात, बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द होण्याची शक्यता, जिल्हा परिषदेकडे पुन्हा अधिकार देण्याच्या हालचालीशिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवर सुपूर्द करण्याला विरोध
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा बदल्या जिल्हापातळीवरती सुपूर्द करण्याला विरोध आहे. बदल्या ऑनलाइनच व्हायला हव्यात. बदल्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्यात दुरुस्ती होऊ शकते. पण शिक्षकांच्या सर्व बदल्या ऑनलाईन हव्यात, असं शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी म्हटलं आहे. बाळकृष्ण तांबारे यांनी सरकारला निवेदन देखील दिलं आहे.
पंकजा मुंडे यांनी घेतला होता निर्णयराज्यातील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता राहण्यास मदत होईल, म्हणून तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे यांनी हा निर्णय घेताना सांगितलं होतं.