माझ्यावरचा हल्ला मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या सूचनेनंतरच : किरीट सोमय्या
kirit somaiya : पुण्यात माझ्यावर झालेला हल्ला मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
kirit somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात झालेल्या झटापटीनंतर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "पुण्यात माझ्यावर झालेला हल्ला हा मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरच झाला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यासंर्भात तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणि पुणे महानरपालिकेत शनिवारी गेले होते. यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि सोमय्या यांच्यामध्ये झटापट झाली होती.
पुण्यातील घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. " मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब आणि रश्मी ठाकरे यांच्या भावाचा पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचारात सहभाग आहे. त्यामुळे हे सर्व जण अस्वस्थ झाले होते. माझ्यावर हल्ला करण्याचा हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करत पुणे महापालिका कार्यालयाला सुट्टी असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आत कसे घुसले? असा प्रश्न किरीट सोमया यांनी उपस्थित केला आहे.
"पुणे महानगर पालिकेला सुट्टी असताना शिवसेनेचे कार्यकर्ते आत कसे गेले? सुट्टी असतानाही कार्यकर्ते आत जाऊन गनिमी काव्याने हल्ला करणार असे नियोजन होते. किरीट सोमय्या यांचे हात-पाय तोडा असं आधीच सांगितलं होतं, माझ्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग होता, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, "पाच कोविड सेंटरचा हा भ्रष्टाचार असून त्याची चौकशी सुरू होती. पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोनामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे माझी हत्या करायला लागल्यावर माझा परिवार शांत बसणार का? उद्धव ठाकरे भ्रष्टाचाराच्या चौकशीला घाबरत आहेत का? पुणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक, स्थानिक पोलीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी नियोजन करून माझ्यावर हल्ला केला आहे. हल्ला झाला असला तरी सर्व घोटाळेबाजांना जेलमध्ये जावे लागणार आहे. या सर्व प्रकरणाबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आले पाहिजे. यासंदर्भात मी उद्या राज्यपालांना भेटणार असून पुणे महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि गृह सचिवांना याबाबत पत्र लिहणार आहे."
महत्वाच्या बातम्या