Harshvardhan Patil : भाजप एका समाजाच्या विरोधी आहे तर मग पहाटेचा शपथविधी कसा झाला? हर्षवर्धन पाटलांचा राज्यमंत्री भरणेंना सवाल
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे. 2014 साली न मागता भाजपला पाठिंबा कुणी दिला? असा सवालही त्यांनी केलाय.
Harshvardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) हे वारंवार आपल्या भाषणात भाजपा हा मुस्लिमविरोधी व जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करतात. मग 2014 साली न मागता भाजपला पाठिंबा कुणी दिला? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. तसेच 2019 ला त्या 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र पहाटे तीन वाजता कोण घेऊन गेल होते? भारतीय जनता पक्ष एका समाजाच्या विरोधात आहे तर तिथे पहाटे शपथविधी कसा झाला? असा सवालही पाटील यांनी केलाय.
विविध मुद्यावरुन हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुम्हाला सत्ता घ्यायची म्हटलं की तो पक्ष चांगला आणि दुसर्याची मतं फोडायची म्हटलं की हा पक्ष वाईट, अशा गोष्टी आता लोकांना कळायला लागल्या असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. इंदापुरात पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. भाजप जर एका समाजाच्या विरोधात आहे तर पहाटेचा शपथविधी कसा झाला? असा सवाल यावेळी पाटील यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे निष्ठावान मानले जातात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दत्तात्रय भरणे यांना रसद पुरवल्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगत होती. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अखेर त्यांचा दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. सलग दोन विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: