भाजप नेते माजी खासदार, माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचं निधन
हरिभाऊ जावळे यांनी यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले त्यानंतर पुन्हा त्यांनी यावल-रावेर मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले.
जळगाव : रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय 67) यांचे आज सुमारे दुपारी 12.30 वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
हरिभाऊ जावळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच, यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यातील भालोद येथील हरिभाऊ जावळे यांचा जन्म 1 जून 1953 रोजी झाला. ते पूर्वी जनसंघात सक्रीय होते. यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले त्यानंतर पुन्हा त्यांनी यावल-रावेर मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले.
सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य असून मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली जबाबदारीही सोपवण्यात आली होती. ते जिल्हा भाजपाचे आजमितीस ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले होते. त्यादरम्यान आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.