Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचं आवाहन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.
Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच सर्वांनी स्वत: ची काळजी घ्यावी असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I have tested #COVID19 positive and in home isolation.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022
Taking medication & treatment as per the doctor’s advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस हे काल लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळं तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. या भेटीत फडणवीस दोन अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांची मतं वळवण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हं होती. मात्र फडणवीसांचा शनिवारचा दौरा तूर्तास रद्द झाला होता. आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांना कोरोणाची लागण झाली आहे.
देशात जीवघेण्या कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24तासात देशात कोरोनाच्या 3 हजार 962 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर यापूर्वी शुक्रवारी 4 हजार 41 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण केरळातील आहेत. केरळ व्यतिरिक्त महाराष्ट्र (Maharashtra), तामिळनाडू (Tamilnadu), तेलंगाना (Telangana) आणि कर्नाटक (Karnataka) मध्येही दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर सतर्क होत केंद्र सरकारनं राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी एक पत्रही लिहिलं होतं.