पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव होतं, आता दुसरं एक नाव येतंय, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल
विदर्भात आणि मराठवाड्यात शिवसेना कोणी वाढवली, आमचा हात पकडून तुम्ही पक्ष वाढवला.. हिंमत असेल वेगवेगळं लढा मग पहा असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अमरावती : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहे. आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे डॉ अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आता सत्ता येईल तर स्वतःच्या बळावर येईल.. पाठीत खंजीर खुपसनारे एकच नाव होतं आधी, आधी एकच चेहरा दिसत होता पाठीत खंजीर खुपणाऱ्याचा पण आता दुसरा चेहरा दिसतो असं म्हणत थेट शिवसेनेवर टीका केली.
कायद्याचा धाक राज्यात संपलेला आहे, भ्रष्टाचार तर विचारूच नका, राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली. नाथाभाऊ खडसेंची प्रॉपर्टी जप्त झाली, मुंबईत तर छगन भुजबळची 100 कोटींची प्रॉपर्टी जप्त झाली पण पत्रकारांनी एक लाईनची बातमी छापली नाही. आता आपण आपल्या ताकदीने लढणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात शिवसेना कोणी वाढवली, आमचा हात पकडून तुम्ही पक्ष वाढवला.. हिंमत असेल वेगवेगळं लढा मग पहा असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकार एकट्याच्या बळावर येईल
यावेळी जेव्हा केव्हा निवडणुका होणार मग ते केव्हाही हो कारण मी जोतिष्य नाही वर 2024 मध्ये झाली तरी यावेळी भाजप एकट्याच्या बळावर सरकार स्थापण करणार तशी तयारी आपली सुरू आहे. यावेळी युतीत निवडणूक लढणार नाही. फक्त जे प्रामाणिकपणे आपल्या सोबत आहे ज्यांच्या सोबत निवडणूक लढवणार...पण नाव मोठं लक्षण खोटं आपल्याला नको. पाठीत खंजीर खोपसणारे आपल्याला नको असं बोलत चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. पंतप्रधान मोदी हे आमचे आई-बाबा आहे आणि जर कोणी मोदींना शिव्या दिल्या तर आम्ही कसं सहन करणार त्यामुळे आता सहन न करता आम्ही पण प्रत्येकाला उत्तर देणार आहोत असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
संघर्ष, सेवा आणि संपर्क या तिघांवर आता लक्ष केंद्रित करणार
आता यानंतर भाजप संघर्ष, सेवा आणि संपर्क या तीन गोष्टीवर लक्षात केंद्रित भाजपा करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आता कोणालाही सोबत घेणार नाही
भाजपच्या कार्यकर्त्यांना संभोधीत करतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मध्यप्रदेशमध्ये आपण कोणाला सोबत घेतलं का?, गुजरात मध्ये कोणाला सोबत घेतलं का?, राजस्थान मध्ये कोणाला घेतो का? नाही कारण याठिकाणी आपण आपल्या ताकदीवर लढतो आणि सरकार बनवतो. त्यामुळे आता आपल्याला या कुबड्या नकोय. आपल्या जीवावर काय होती शिवसेना.. विदर्भात कोणी आणलं शिवसेनेला, मराठवाड्यात कोणी आणलं, आमचं बोट पकडून तुम्ही गावो गावी आले आणि आमच्याच पाठीत खंजीर खुपसलं.. आता आम्हाला तुमची संगत नको, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीच्या वरुड येथे भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत केलं.