'झुकेगा नही' म्हणणाऱ्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी कधी जाणार? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Devendra Fadanvis : ही लडाई व्यवस्था परिवर्तनाची आहे, जनतेच्या आक्रोशाला संघटित करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
औरंगाबाद: 'झुकेगा नही' असं म्हणणाऱ्या 80 वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले, पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या (BJP Jal Aakrosh Morcha) 80 वर्षाच्या आजीच्या घरी मुख्यमंत्री कधी जाणार असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. औरंगाबादच्या पाण्याचा सत्यानाश जर कोणी केला आहे तर तो शिवसेनेने केला आहे असा आरोपही त्यांनी केला. संभाजीनगरमध्ये पाणी पोहोचल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना स्वस्थ झोपू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्या 25 वर्षाच्या काळात शिवसेनेने औरंगाबादच्या पाण्याचा सत्यानाश केला. महापालिकेकडे एकही पैसा उरला नाही. आता जे काही चाललंय ते केवळ केंद्र सरकारच्या पैशावर सुरू आहे. महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. संभाजीनगरमध्ये जे काही झालं ते आमच्या काळात झालं. आताचं सरकार हे पाण्याचं शत्रू आहे."
संभाजीनगरच्या आजच्या या मोर्चाने महाराष्ट्राला हादरवून सोडला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, "आजचा मोर्चा हा संभाजीनरगच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा आहे. आजची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराविरोधातील हा मोर्चा आहे. संभाजीनरगमधील जनता पाण्यासाठी तडफडतेय, त्याकडे शिवसेनेने दुर्लक्ष केलं आहे. आजचा मोर्चा हा जनतेच्या आक्रोशाला संघटित करणारा मोर्चा आहे. संभाजीनगरला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही."
येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये इथल्या नागरिकांना मोठी संधी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. येत्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भ्रष्ट सत्ता उलथवून टाका असं आवाहनही त्यांनी केलं.
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडून आज 'जल आक्रोश' मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहिले. आजच्या या मोर्चामध्ये महिला दूषित पाणी आणि डोक्यावर हंडे, घागरी घेऊन सहभागी झाल्याचं दिसून आलं.