(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारी पैशाची उधळण, सह्याद्री अतिथीगृहाच्या फक्त डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांची बिलं
एवढे पैसे फक्त सिंलिग दुरुस्त करणे, 3 फुटांची कपाऊंड वॅाल बांधणे, खिडक्या/ दरवाजे बसवणे, वूडन फ्लोरिंग बसवणे, संडास/बाथरूम दुरुस्त करणे अशी फक्त डागदुजी करण्यात आली आहे.
मुंबई : एकीकडे कोरोना नंतर पूरपरिस्थितीमुळे राज्याची तिजोरी खाली होत आहे. तर दुसरीकडे सरकार पैशाची उधळण सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त डागदुजींसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करत असल्याचं समोर आलंय. व्हीव्हीआयपींसाठी बांधण्यात आलेल्या सह्याद्री अतिथीगृहावर कोट्यवधी रुपयांची डागदुजी करून बीलं लाटली गेली आहेत. एवढे पैसे खर्च करूनही सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये सिलिंग कोसळण्याच्या दुर्घटना कशा घडतात? हा प्रश्न देखील उपस्थित होतो.
सह्याद्री अतिथीगृहाच्या डागडुजीसाठी थोडेथोडके नाही तर तब्बल 1 कोटी 89 लाख 32 हजार 930 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या पैशांचं काय केलं असेल. तर एवढे पैसे फक्त सिंलिग दुरुस्त करणे, 3 फुटांची कपाऊंड वॅाल बांधणे, खिडक्या/ दरवाजे बसवणे, वूडन फ्लोरिंग बसवणे, संडास/बाथरूम दुरुस्त करणे अशी फक्त डागदुजी करण्यात आली आहे.
या कामा संदर्भात प्रकल्प शाखेनंही संशय व्यक्त केला होता. प्रकल्प शाखा म्हणजे जे पीडब्लूडीच्या अखत्यारित जे काही काम चालतं त्यावर ही शाखा नजर ठेवते आणि यांचा रिमार्क महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे एवढ्या कोट्यवधी रुपयांची कामं केल्यानंतर स्वाभाविक आहे, प्रकल्प शाखेने फोटो मागवले. त्यावर निघालेले दरावाजे, खिडक्या वाळवीच्या प्रादुर्भावामुळे एकदम पोखरून खराब झाल्या आहेत. त्यामुळे सदर सामान निकामी झाल्यामुळे डेब्रिजमध्ये फेकून देण्यात आलं आहे असं उत्तर त्यांना देण्यात आलं आहे.
ज्या सह्याद्री अतिथीगृहावर रोज व्हीव्हीआयपी येत जात असतात तिकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रोज ठाण मांडून आहेत. या अतिथीगृहात एवढी रेलचेल असताना तिकडे दरवाजे खिडक्या वाळवी लागेपर्यंत ठेवले जातील का? सार्वजनिक बांधकामाच्या याच हलगर्जीपणामुळे मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात वाचले होते. काही दिवसांपूर्वी या सह्याद्री अतिथीगृहातलं सिलिंग कोसळलं होतं. मग प्रश्न हाच आहे की एवढे पैसै खर्च करून असं निकृष्ट दर्जाचं काम होत असेल यावर जरब कोणाचा बसणार?
मंत्र्यांच्या बंगल्यावर तसेच कार्यालयावर कोटींची उधळण केली जात आहे. प्रत्येकालाच आलिशान बंगला आणि कार्यलय पाहिजे आहे. पण
सर्वसामान्यांच्या खिशातून येणाऱ्या पैशांवर करण्यात येणाऱ्या कामावर काही तरी निर्बंध येणे गरजेचं आहे. अन्यथा कामांची बिलं निघत जातील आणि निकृष्ट बांधकामांमागे एक एक काम वाढत जाईल. त्यामुळे सरकारी पैशाची अशी उधळण थांबावयाला पाहिजे.