(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगाव येथील सभेची तयारी अंतिम टप्प्यात; सभेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेला खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तीन नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथे शुक्रवारी सायंकाळी राहुल गांधींनी जंगी सभा होणार आहे उद्या राहुल गांधी शेगावातील संत गजानन महाराजांच्या समाधीच दर्शन घेऊन येथील सभेला संबोधित करणार आहे. या सभेची आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सभेला सोनिया गांधी , राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची शक्यता असल्याने सभेच्या ठिकाणी आणि शेगावात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.
सभास्थळी मोठा बंदोबस्त असून सभेच्या कानाकोपऱ्यातून बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. बीड , औरंगाबाद , नागपूर व बुलढाणा असे चार बॉम्बशोधक आणि नाशक पथकासोबत चार श्वानांच्या मदतीने सभेच्या संपूर्ण सभास्थळाची तपासणी करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या सभेसाठी व जिल्ह्यातील तीन दिवसांच्या सर्व कार्यक्रमासाठी पोलीस विभाग तयार असल्याची माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांच्या शेगाव येथील जाहीर सभेला खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तीन नेते उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय. यापैकी सोनिया गांधी या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. काँग्रेसने शेगावच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन हे नेते शेगावच्या सभेला हजर राहणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर या निमित्तानं महाविकास आघाडीचे सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल.
सभेच्या व यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , चंद्रकांत हंडोरे , यशोमती ठाकूर अशा बड्या नेत्यांसह अनेक नेते शेगावात तळ ठोकून यात्रेच व सभेच नियोजन करताना दिसून येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ही पदयात्रा तीन दिवस असणार आहे त्यामुळे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळाची पाहणी करणे , आगमन व निर्गमन रस्त्यांची पाहणी करणे यासाठी राहुल गांधींच्या सभेला जवळपास सहा लाख लोकं येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे . राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.