Bharat Jodo Yatra Maharashtra: ‘मोदी सरकार के दो भाई, ईडी और सीबीआय’; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा टोला
Bharat Jodo Yatra Maharashtra: केंद्रीय तपास यंत्रणा ह्या केंद्र सरकारच्या हातातलं हत्यार झालं असल्याची जोरदार टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली.
Bharat Jodo Yatra Maharashtra: संजय राऊतांना जामीन (Sanjay Raut Bail) देताना कोर्टाने जे ताशेरे ओढलेत ते पाहता ईडी (ED) केवळ मोदी सरकारच्या हातातलं हत्यार झाल्याचं स्पष्ट झालं असल्याची जोरदार टीका काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केली. ‘मोदी सरकार के दो भाई, ईडी और सीबीआय’ असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेली 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली असून ही यात्रा नांदेड जिल्ह्यात आहे. राज्यातील यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. आज यात्रेच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. बुधवारी, शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. त्याबाबत आजच्या पत्रकारात परिषदेत त्यांनी म्हटले की, केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केवळ विरोधी पक्षातील लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी, त्यांचा छळ करण्यासाठी केला जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्याचीच किंमत मोजली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनाही चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर याच पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षांनी वारंवार केंद्रीय यंत्रणांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर केला जात असल्याबद्दल आवाज उठवला आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टाने ईडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. ‘मोदी सरकार के दो भाई, ईडी और सीबीआय’, असा टोलाही जयराम रमेश यांनी लगावला.
सहकार क्षेत्र संपवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न
सहकार क्षेत्र संपवण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला. महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची कामे झालेली आहेत. या क्षेत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा दबादबा आहे. हा दबदबा मोडून काढण्यासाठीच भारतीय जनता पक्षाने केंद्रात सहकार खाते निर्माण करून गृहमंत्र्यांकडेच त्याचा कारभार सोपवला असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्र मोडीत काढण्यासाठीच हे केले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात सहकार क्षेत्रावर कर लावला जात नव्हता. परंतु मोदी सरकारने सहकारावरही कर लावला आहे. साखर निर्यातीची मर्यादाही कमी केली आहे. हे सर्व सहकार क्षेत्र संपवण्यासाठी चालले आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.
गुजरात, हिमाचलमधून यात्रा का नाही?
पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रा गुजरात, हिमाचल प्रदेश या निवडणुकीच्या राज्यातून जात नाही. महाराष्ट्रातही फक्त पाचच जिल्ह्यातून पदयात्रा जात आहे, इतर राज्यात तसेच भागात ही पदयात्रा का जात नाही? असे प्रश्न विचारले जात आहेत. पण कन्याकुमारी ते काश्मीर ही भारताची उत्तर-दक्षिण दोन ध्रुव याने जोडले जात आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक व पदयात्रेचे वेळापत्रक यांचा ताळमेळ लागणेही अशक्य आहे. निवडणुक काळात पदयात्रा गुजरात किंवा हिमाचल प्रदेशात गेली तर सर्व संघटना पदयात्रेतच व्यस्त राहिली असती. पदयात्रेचा मार्ग विविध क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करुन आखला गेलेला आहे, सुरक्षेसंदर्भातही काही प्रश्नांचा विचार करुन हा मार्ग निवडलेला आहे.