Bhandara News : भंडाऱ्यात भर पावसात वाघोबाचं दर्शन, निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या लाखांदूरच्या वाटेवर प्रवाशांची रोखली वाट
Bhandara News : लाखांदूरच्या (Lakhandur) निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वाटेवर भर पावसात रुबाबदार वाघाचं (Tiger) दर्शन झालं. यावेळी वाहन चालकांची वाघानं वाट रोखल्याचं पाहायला मिळालं.
Bhandara News : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. कोकणासह विदर्भात पावसाचा जोर अधिक असल्याचं चित्र दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस सुरु आहे. कुठं मुसळधार तर, कुठं हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बसरत आहेत. लाखांदूरच्या (Lakhandur) निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वाटेवर भर पावसात रुबाबदार वाघाचं (Tiger) दर्शन झालं. यावेळी वाहनचालकांची वाघानं वाट रोखल्याचं पाहायला मिळालं.
मुरझा ते पारडी या मार्गावर एका रुबाबदार वाघाचं दर्शन
सध्या सर्वत्र पावसाचं धुमशान सुरु आहे. कुठं मुसळधार तर, कुठं हलक्या स्वरुपाच्या पाऊस कोसळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. या पावसामुळे अनेकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणेही सध्या टाळले आहे. अशा अल्हाददायक वातावरणात भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील निसर्ग सानिध्यात वसलेल्या मुरझा ते पारडी या मार्गावर एका रुबाबदार वाघाचं दर्शन झालं. या रुबाबदार पट्टेदार वाघोबानं या मार्गावरून दिमाखदार चालत जाण्याचा वॉक केला. तब्बल दहा ते पंधरा मिनिट या वाघोबानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची वाट रोखून धरली. सातत्यानं पाऊस बघणाऱ्या वाटसारुंच्या चेहऱ्यावर वाघोबाचं दर्शन झाल्यानं समाधान बघायला मिळालं. इथून मार्गक्रमण करणाऱ्या वाटसरूंनी या ऐटीत चालणाऱ्या वाघोबाला त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला.
मोहाडी तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. भात पिकाची लागवड करत असताना विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसात अचानक शेतात वीज कोसळली. यात एका पुरुषासह दोन महिलांचा मृत्यू तर, तीन महिला गंभीर जखमी झाल्यात. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात घडली. युवराज भिमटे यांचा बोंदरी या गावाच्या शेत शिवारात मृत्यू झाला. तर, वच्छला बावनथळे (50), लता गाढवे (50) यांचा मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द या गावालगत झाला. या दोन महिलांसह सुलोचना सिंगनजुडे (55), बेबीताई सयाम (55), निर्मला खोब्रागडे (50) या तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या सर्व महिला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नवेझरी येथील असून त्या भात पिकाच्या लागवडीसाठी निलज खुर्द येथील सूर्यप्रकाश बोंद्रे यांच्या शेतात महिला मजूर म्हणून आल्या होत्या.
संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस
संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसात वीज पडल्यानं आठ जणांचा बळी गेला आहे. तर काही भागात पावसामुळं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये तीन जण वाहून गेले आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. तर विविध ठिकाणी वीज पडल्यानं 30 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडल्यानं पाच जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झालेत. तर यवतमाळ इथं भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अमरावती इथं वीज पडल्यानं दोघांचा अशा 8 जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरात वर्धा येथील एक तर, अकोला येथील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. बचाव पथक या तिघांचाही शोध घेत असून अद्यापही या तिघांचाही शोध लागलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या: