विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप
Bhandara News : आरोग्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गोळ्या ह्या बुरशी युक्त असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
![विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप bhandara news deworming tablets with fungus given to students at bhandara विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/accf7c225f1fd2270dc50d58b090c1ba_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhandara News : विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. मात्र, ह्याच जंतनाशक गोळ्या त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरल्या असत्या. विद्यार्थ्यांसाठी आलेल्या जंतनाशक गोळ्या या बुरशीयुक्त असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या गोळ्या जंतुनाशक की जंतुपोषक हाच सवाल येथील संतप्त पालक विचारत असून हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भंडाऱ्या जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने 'राष्ट्रीय जंतनाशक दिना'निमित्त एक ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम सोमवारपासून सुरू केली. भंडारा तालुक्यातील खरबी येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सोमवारी सकाळी 11 वाजता जंतनाशक गोळ्या वितरण सुरु केले होते. या शाळेत 450 गोळ्या वितरणासाठी आरोग्य विभागाने दिल्या होत्या. 11 वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना गोळ्या वितरित करीत असताना एका स्ट्रिपमध्ये काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यध्यापकांनी गोळ्यांचे वितरण तातडीने थांबवले आणि त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली. विशेष म्हणजे या बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून 7 विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात झाली.
संबंधित बॉक्स मधील अनेक स्ट्रिपमध्ये बुरशीयुक्त गोळ्या आढळून येत असल्याने भंडारा आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले असून आरोग्य विभागाच्या या जीवाशी खेळण्याचा प्रकारामुळे पालक मात्र कमालीचे संतप्त झाले.
या प्रकाराची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह शाळेला भेट दिली. बॅच क्रमांक एईटी 216 मध्ये तीन गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्याचे चौकशीत आढळून आले. या गोळ्या ताब्यात घेत बुरशीयुक्त गोळ्या असलेल्या स्ट्रीपमधून ज्या सात विद्यार्थ्यांनी गोळ्या घेतल्या त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप व्यवस्थित असून आरोग्य विभागाकडून देखरेख ठेवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)