भगीरथ भालके आणि लक्ष्मण ढोबळेंची कन्या उद्या बीआरएसमध्ये प्रवेश करणार
KCR at Solapur : निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच कालावधी असताना बीआरएसने (BRS) महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
K Chandrashekar Rao at Solapur : निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच कालावधी असताना बीआरएसने (BRS) महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यांचे सोलापूर शहरांमध्ये आगमन झालं आहे. सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केसीआर यांनी बीआरएसच्या वाढीसाठी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. आता केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यात दोन मोठे स्थानिक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. भगीरथ भालके आणि लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे मंगळवारी बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीचं होणारं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सोलापुरातील स्थानिक नेते जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, प्रवक्ते उमेश पाटील आणि अभिजित पाटील यांची पंढरपूर मंगळवेढा येथील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यासोबत बैठक झाली. भगीरथ भालके हजारो कार्यकर्त्यांसह उद्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा बसलाय. ते डॅमेज कंट्रोल भरण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरु केली आहे.
भगीरथ भालके यांच्याशिवाय माजी मंत्री आणि भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे साळुंखे उद्या के चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत. कोमल या सोलापूर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. कोमल यांचाही उद्या बीआरएसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची शेकडो गाड्यांसह सोलापुरात सिंघम स्टाईलने एन्ट्री
सोलापुरातील मार्केट यार्डसमोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर केला गुलाब पुष्पांचा वर्षाव करतं त्यांचं स्वागत केलं. केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम असून मंगळवारी त्यांच्यासोबत त्यांचं अख्ख मंत्रिमंडळ विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे. त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या केसीआर यांच्या या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय. केसीआर यांच्या दौऱ्यात तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेते असतील. तेलंगणातून तब्बल 600 गाड्यांचा ताफा आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे.