![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दुप्पट नफ्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक, परदेशी पळालेल्या इचलकरंजीच्या ठकसेनला ठोकल्या बेड्या
Belgaum News Update : पत्नी आणि मुलांसह शिवानंद याने मालदीव, इजिप्त आणि दुबई फिरून शेवटी नेपाळमध्ये मुक्काम ठोकला होता. बेळगाव पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली.
![दुप्पट नफ्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक, परदेशी पळालेल्या इचलकरंजीच्या ठकसेनला ठोकल्या बेड्या belgaum news update Accused arrested in Mumbai who cheating to get double money दुप्पट नफ्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक, परदेशी पळालेल्या इचलकरंजीच्या ठकसेनला ठोकल्या बेड्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/02/d62dd33147e2acc558ab18682da1b0f5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : सिमेंट आणि लोखंडाच्या व्यापारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या इचलकरंजीच्या ठकसेनाला बेळगाव पोलिसांनी मुंबईतून अटक केली. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. शिवानंद दादू कुंभार (वय 46 रा.इचलकरंजी ) असे संशयिताचे नाव आहे.
बेळगावातील एका व्यक्तीच्या मार्फत शिवानंद कुंभार याने सिमेंट आणि लोखंडाच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखवून अनेकांकडून पंचाहत्तर लाखांहून अधिक रक्कम उचलली होती. याबाबत बेळगावच्या सी ई एन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. काही जणांना सुरुवातीला त्याने पैसे दिले. पण मोठी रक्कम गोळा झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह परदेशी गेला होता.
पत्नी आणि मुलांसह शिवानंद याने मालदीव, इजिप्त आणि दुबई फिरून शेवटी नेपाळमध्ये मुक्काम ठोकला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच भारतीय दूतावास आणि इंटरपोल यांच्या मदतीने बेळगाव पोलिसांनी नेपाळ पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यावेळी शिवानंद कुंभार हा मुंबईला येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुले पोलिसांचे एक पथक मुंबईला आले. 26 जून रोजी बेळगाव पोलिसांनी त्याला मुंबईतून ताब्यात घेतले.
शिवानंद याला मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर बेळगावला आणून त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने सिमेंट आणि लोखंड व्यवसायात गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखवून अनेक जणाकडून पैसे उकळल्याचे कबूल केले. लोकांकडून उकळलेल्या पैशातून शिवानंद याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात मालमत्ता देखील खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
शिवानंद याच्या नावाने असलेली बँक खाती गोठवण्यात आली असून पोलिसांनी त्याच्याकडून रोख वीस लाख रुपये जप्त केले आहेत. गुन्हे तपास विभागाचे एसीपी नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निंगन गौडा पाटील,पोलीस निरीक्षक बी.आर.गड्डेकर, काडय्या चरलिंगमठ, महेश वडियार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)