Belgaon News : यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; वाहन झाडाला आदळून अपघात, सहा जणांचा मृत्यू
Belgaon News : बेळगावातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला.
![Belgaon News : यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; वाहन झाडाला आदळून अपघात, सहा जणांचा मृत्यू Belgaon News six Savadatti Yallamma devi devotees died in a terrible road accident Belgaon News : यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; वाहन झाडाला आदळून अपघात, सहा जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/1fa4b20ef1ca8d3d17f760600a458124167288833362683_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Belgaon News : बेळगाव (Belgaon) जिल्ह्यातील सौंदत्तीमधील यल्लमा देवीच्या (Shree Renukaa Yallamma Devi Temple) दर्शनाला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. भक्तांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले.
पिकअप वाहनातून हे भाविक प्रवास करत होते. वळणावळणाच्या रस्त्यामुळे ताबा सुटून वाहन वडाच्या झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. अपघातातील मृत भाविक हे रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते. हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
पाच जणांचा जागीच मृत्यू, एकाने उपचारादरम्यान प्राण सोडले
सौंदत्ती हुल कुंद गावातून दर्शनासाठी यल्लम्मा देवीच्या मंदिराकडे जात असताना ही घटना घडली. अपघातग्रस्त गाडीतून 23 जण प्रवास करत होते. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची रुग्णालयात उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. अपघातानंतर पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
वाहनात बसल्यानंतर काही वेळातच अपघात
काळ आला होता आणि वेळही आली होती, असंच काहीसं या प्रकरणात घडलं. पण भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायी निघाले होते. यावेळी संबंधित वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिलं. त्याने गाडी थांबवलं आणि भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असं सांगितलं. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला आणि त्यात सहा जणांनी आपले प्राण गमावले.
यल्लमा देवी...लाखो भाविकांचं श्रद्धास्थान
बेळगावातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवी ही कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसंच आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आहे. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला यल्लामा देवीची यात्रा भरते. यल्लमा देवीच्या यात्रेला पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक आणि अन्य ठिकाणाहून लाखो भाविक सौंदत्ती डोंगरावर येत असतात. कोरोनाच्या काळात यल्लमा देवीचं मंदिर भाविकांसाठी बंद होतं. परंतु 2022 मध्ये यल्लमा देवीची यात्रा धुमधडाक्यात साजरी करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)