Beed : आधी लगीन परीक्षेचे! लग्नमंडपातच नववधूने दिली ॲानलाईन परीक्षा, होतंय कौतुक
Beed News Updates : दुपारी साडेबारा वाजता लग्न लागले आणि बरोबर एक वाजता नववधूने तिथेच लॅपटॉप उघडला आणि दोन तास ऑनलाइन परीक्षा (Online Exam) दिली.
Beed News Updates : शिक्षणाप्रती आस्था असलेली अनेक उदाहरणं आपण पाहतो. बीडच्या अंबाजोगाईत देखील असंच एक उदाहरण समोर आलं आहे. दुपारी साडेबारा वाजता लग्न लागले आणि बरोबर एक वाजता नववधूने तिथेच लॅपटॉप उघडला आणि दोन तास ऑनलाइन परीक्षा (Online Exam) दिली. आयुष्याच्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी एकाच मंडपात देणारी ही नववधू आहे बीडच्या अंबाजोगाईमधील (beed ambajogai) स्वरूपता काळे या नववधूने डोक्यावर अक्षता पडताच हाती लॅपटॉप घेतला आणि ऑनलाइन परीक्षा पूर्ण केली.
दुपारी साडे बाराचा मुहूर्त होता. अंबाजोगाई शहरातील पांडुरंग मंगल कार्यालयामध्ये मूळच्या अंबाजोगाई तालुक्यातील सांगाव इथल्या स्वरूपताचा विवाह परभणीमधल्या वैभव सोमवंशी यांच्याशी झाला. डोक्यावर अक्षता पडल्या. नववधूने वराला वरमाला घातली, तोपर्यंत ते सगळे सोपस्कर अगदी विधीवत पार पडले.
मात्र एक वाजताच नववधूने तिथेच बाजूला ठेवलेला लॅपटॉप उघडला आणि ऑनलाइन परीक्षा द्यायला सुरुवात केली. खरंतर डोक्यावरचा अक्षता आणखी डोक्यावरच होता. गळ्यामध्ये घातलेली वरमाला सुद्धा गळ्यातच होती. आजूबाजूला सगळा गोंधळ कानावर पडत होता तरीही थोडं सुद्धा न डगमगता स्वरूपाने लॅपटॉप वरून ऑनलाइन परीक्षा द्यायला सुरुवात केली.
स्वरूपता काळे ही अत्यंत सामान्य कुटुंबातली मुलगी आहे. जी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एमबीएच्या द्वितीय वर्षांमध्ये शिकत आहेत. खरं तर सध्या महाविद्यालयातील परीक्षांचा काळ चालू आहे आणि त्यातच स्वरूपताच लग्न जमलं. विशेष म्हणजे ज्या दिवशी लग्नाचा मुहूर्त निघाला त्याच दिवशी ऑनलाइन परीक्षेचा पेपर होता. मग काय सगळी तयारी सुद्धा झाली.
आयुष्यातील सगळ्यात अनमोल असा क्षण म्हणजे लग्न. मात्र या लग्न सोहळ्यात सुद्धा स्वतःच्या करिअरकडे थोडंसुद्धा दुर्लक्ष न करता लग्नातले सगळे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या स्वरूपताकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. साडेबारा वाजता बरोबर लग्न सोहळ्याला सुरुवात झाली अक्षता पडल्या आणि एक वाजता एम बी ए ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या पेपरला सुरुवात झाली.
खरंतर लग्न म्हटलं की दिवसभर लगीन घाई आलीच उद्याचीच लगीन घाई की स्वरूपताच्या लग्नामध्ये सुद्धा पाहायला मिळत होते. मात्र दुपारी एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत दोन तास स्वरूपता ऑनलाईन परीक्षा देत होती.. तीन वाजता परीक्षा पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा राहिलेल्या विधीला सुरुवात झाली. लग्नासारख्या इतक्या महत्त्वाच्या सोहळ्यात सुद्धा स्वरूपताने अगदी धीराने सामोरे जात आपल्या शिक्षणाबद्दलची बांधिलकी दाखवून दिली.