Beed: शेतकऱ्याला वेठीस धरू नका, राजकारण न करता उसाचं गाळप करा; धनंजय मुंडे यांच्या कारखानदारांना सूचना
ऊस तोडीचे नियमन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी त्यावर नियंत्रण ठेवावे अशी सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
![Beed: शेतकऱ्याला वेठीस धरू नका, राजकारण न करता उसाचं गाळप करा; धनंजय मुंडे यांच्या कारखानदारांना सूचना Beed Minister Dhananjay Munde on sugar farmers and sugar factory Beed: शेतकऱ्याला वेठीस धरू नका, राजकारण न करता उसाचं गाळप करा; धनंजय मुंडे यांच्या कारखानदारांना सूचना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/28/de5258103fed67aeba85c09caf276439_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.
आगामी काळात अनेक निवडणुका आहेत, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी तिथे राजकारण जरूर करावे. परंतु शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने समन्वय साधून साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस गाळपाच्या सूचना द्याव्यात असं पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, "राजकारण साधायला आगामी निवडणुका समोर आहेत, तिथे राजकारण करता येईल. मात्र शेतकरी संकटात असताना ऊस गाळपावरून सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी राजकारण करू नये, सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत, त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जाईल, असे नियोजन साखर आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासन व साखर कारखान्यांनी मिळून करावं."
आज परळी येथील शासकीय विश्रामगृहात बीड जिल्ह्यातील अधिक ऊस क्षेत्र असलेल्या उसाचे नियोजन करण्यासाठी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, ट्वेन्टी-ट्वेन्टी साखर कारखाना सायखेडा, अंबासाखर सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी शुगर्स, जय महेश साखर कारखाना माजलगाव यांच्या प्रतिनिधी व अधिकारी तसेच साखर आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासन यांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक बोलावली होती.
ऑक्सिजन सारखे नियोजन उसाचे करा
कारखान्यांनी ठरवून दिलेला प्रोग्रॅम, त्याप्रमाणे झालेली नोंद, ठराविक कार्यक्षेत्र त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या परिस्थितीचाही विचार करावा. कोविड काळात जेव्हा ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मोठमोठे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी मिळून लोकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रभर जागून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. याची आठवण करून देत, यावर्षी ऊस उत्पादन जास्त असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याचे ऑक्सिजन प्रमाणेच नियोजन करून उसाचा प्रश्न मिटवून द्यावा लागणार आहे, असेही या बैठकीत बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
चांगल्या पावसाने यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न असताना नोंदणीकृत व नोंदणी नसलेल्या सर्व ऊसाचे देखील व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यातील दैनिक उसतोडीचे नियोजन व समन्वय साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्या-त्या तहसीलदारांना जबाबदारी द्यावी, साखर आयुक्त कार्यालय, तहसीलदार व साखर कारखाना प्रशासन यांनी मिळून राजकारण विरहित ऊसतोड केली जाईल याचे व 100 टक्के ऊस गाळप करण्याचे नियोजन करावे अशा सूचना धनंजय मुंडे यांनी दिल्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)