शितल म्हात्रेंचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला शिंदे गटाच्या महिलांची मारहाण, विनयभंग केल्याचा आरोप
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओची रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलीय.
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve ) आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे (Shital Mhatre) यांच्या व्हिडिओची रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबईचा कांदिवलीमध्ये मारहाण केलीय. राजेश गुप्ता असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान, मारहाण करून नंतर गुप्ता यांच्याविरोधात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुप्ता यांना अटक केली आहे.
प्रकाश सुर्वे यांच्या समर्थक असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी राजेश गुप्ता यांच्या घरी जाऊन विचारपूस करत असताना राजेश गुप्ता यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिलांवर हात उचल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी राजेश गुप्तांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर प्रकाश सुर्वे यांच्या समर्थक महिला कार्यकर्त्यांनी गुप्ता विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजेश गुप्ता यांना अटक केली आहे.
राजेश गुप्ता यांनी काल रात्री आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्या शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओची रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी यापूर्वीही दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडीओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असं या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघानंतर आता राजेश गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
शिंदे गटाची आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेतील शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केलाय. रविवारी पहाटे शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार केली होती.
शनिवारी रात्री हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच रात्री उशिरा दहिसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.