बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे आढळून आले आहे.
नागपूर : आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे येत्या सहा महिन्यात रवी राणा यांच्यावर कारवाई करणार असल्याचे निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिलेल्या शपथ पत्रात सांगितलं.
आमदार रवी राणा यांनी निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे आढळून आले आहे. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी 25 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. परंतु या प्रकरणात अनेक महिन्यापर्यंत काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे आणि सुनील भालेराव यांनी याचिका दाखल करण्यात आली होती.
त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. दरम्यान आमदार रवी राणा यांना जून महिन्यात लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याची नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने न्यायालयात दिली. तसेच ही कारवाई आता येणाऱ्या सहा महिन्यात पूर्ण केली जाईल असेही सांगितले.
गेल्या विधानसभेत निवडणुकीसाठी 28 लाख रुपये खर्च मर्यादा असतांना आमदार रवी राणा यांनी 41 लाख 88 हजार 402 रुपये खर्च केला असल्याचा याचिककर्त्यांचं म्हणणं आहे.