Dr. Babasaheb Ambedkar : चैत्यभूमीवर लगबग, यंदा महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले.
चैत्यभूमीवर विविध कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात मंगळवारी सहयाद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला हजेरी लावली. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढू शकते या धर्तीवर प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
उत्सवात संयम पाळा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन या दोन्हीही कार्यक्रमावेळी आपण कोरोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले ही खरोखरच प्रशंसेची बाब आहे. आता कोरोनाचे सावट कमी झाले आहे त्यामुळे यंदा महामानवाची जयंती आपण सर्वांनी उत्साहाने साजरी करायची आहे. मात्र उत्सवात संयम पाळावा.'
चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार : गृहमंत्री
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. त्या अनुषंगाने मुंबई महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने सर्व उपाययोजना करण्यात येतील. राज्य शासनाच्या वतीने 14 एप्रिल बाबतच्या मार्गदर्शक सूचना आगामी चार दिवसात प्रसिद्ध करण्यात येतील. महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंती दिनी राज्य शासनाच्या वतीने चैत्याभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीच्या मागणी यावेळी मान्य करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Price Today : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर
- PAN Aadhaar Link : 'या' व्यक्तींना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक, जाणून घ्या काय आहे कारण?
- Yadadri Temple : यद्रादीतील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर भाविकांसाठी खुलं, पुर्नबांधणीमुळे बंद होतं मंदिर, मंदिरासाठी 1800 कोटी रुपयांचा खर्च
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha