माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणीत वाढ, बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाथरी येथील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे.
Babajani Durrani : माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाथरी येथील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. महसूल विभागाने SIT स्थापन करण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याबाबत चौकशी होणार आहे. SIT मध्ये विभागीय आयुक्त परभणी, अप्पर जिल्हाधिकारी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, संचालक नगर रचना व मूल्य निर्धारण संचालनालय पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
SIT ने 3 महिन्यात संपूर्ण चौकशी करुन शासनाला अहवाल देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीबाबत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी लक्षवेधी मांडून केली चौकशीची मागणी होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आलं आहे. दरम्यान, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काही दिवसापूर्वीच बाबाजानी दुर्राणी यांनी केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश
बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची साथ सोडत काँग्रेसची वाट धरली आहे. परभणीमध्ये सुरेश वरपूडकर काँग्रेस मधून भाजपमध्ये गेल्यानंतर आता माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय. देशपातळीवर काँग्रेस पक्ष हा भाजप विरोधात लढत असल्याने आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांसह आपण काँग्रेस प्रवेश केला असून येत्या काळात काँग्रेस वाढविण्यावर भर देणार असल्याचे बाबाजी यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीत ही त्यांनी पाथरी विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे मागच्या महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. सर्व तयारी करण्यात आली होती, मात्र ऐन वेळी हा प्रवेश झाला नाही आणि आता बाबाजानी यांनी काँग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार साजिद पठाण यांनी लक्षवेधी मांडून पाथरी शहरामध्ये अवैध बांधकाम केल्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सदरील बांधकामाच्या पाठीमागे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा थेट सहभाग असल्याचंही आमदार साजिद पठाण यांनी सभागृहात सांगितले होते. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच याबाबत एक समिती नेमून अहवाल मागून घेतला जाईल आणि कारवाई केली जाईल अशी घोषणा देखील केली होती. त्यानंतर मात्र माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती.
महत्वाच्या बातम्या:
























