दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन
दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.
मुंबई : दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. जुन्नरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 ते 90 च्या दशकात बाबा शिंगोटे यांचा वृत्तपत्र वितरण क्षेत्रात दबदबा होता. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
1999 - 2000 मध्ये त्यांनी मुंबई चौफेर नावाचं टॅब्लॉईड सायंदैनिक सुरु केलं. त्यानंतर आपला वार्ताहर, पुण्यनगरी, हिंदमाता, कर्नाटक मल्ला ही दैनिकं त्यांनी कोणतही भांडवल नसताना सुरु केली. त्यातील पुण्यनगरी हे दैनिक महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलं.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.