Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा मराठवाडा दौरा, नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
Aurangabad : आदित्य ठाकरे यांचा दौरा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Aurangabad News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 26 नोव्हेंबरला बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार असतानाच, आता युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील मराठवाड्याचा दौरा करणार आहे. आदित्य ठाकरे हे 8 नोव्हेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहे. सोबतच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राजकीय पक्षातील नेते बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतांना पाहायला मिळत आहे. तर गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. आता आदित्य ठाकरे हे औरंगाबादच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 8 नोव्हेंबरला हा दौरा होण्याची शक्यता असून, त्यानुसार स्थानिक नेत्यांकडून तयारी करण्यात येत आहे.
भूमरेंच्या मतदारसंघात असणार दौरा...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांचा दौरा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात असणार आहे. यासाठी स्थानिक पदाधिकारी यांना तयारीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांच्या मतदारसंघात रॅली काढली होती.
शेतकऱ्यांशी संवाद साधणार....
औरंगाबाद दौऱ्यावर येणारे आदित्य ठाकरे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. दरम्यान याचवेळी ग्रामीण भागातील एका गावात आदित्य ठाकरे यांचा शेतकरी मेळावा होण्याची देखील शक्यता आहे. यावेळी ते शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार असल्याचे बोलले जात आहे. तर उद्या परवा याबाबत पक्षाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाण्याची शक्यता आहे.