किरीट सोमय्यांवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचे केंद्रीय गृहसचिवांना पत्र, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Devendra Fadnavis on Kirit Somaiya Attack : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहसचिवांना पत्र लिहिले आहे.
Devendra Fadnavis on Kirit Somaiya Attack : खार पोलीस ठाण्याबाहेर शनिवारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर जमावाने केलेल्या हल्ल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. किरीट सोमय्यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली असताना दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहसचिव अजय भल्ला यांना पत्र लिहीले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर पोलिसांना पूर्वसुचना देऊन किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर आला होता. शिवसैनिकांकडून हल्ला होऊ शकतो, त्यामुळे त्यांची गर्दी हटवावी असे सोमय्या यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यावर कार्यवाही केली नाही. त्याच्या परिणामी सोमय्या यांच्या कारवर दगडफेक, बाटल्या फेकून मारण्यात आल्या. पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
गृहसचिव अजय भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. मुंबई पोलिसांच्या आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतरदेखीलही महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोमय्या यांच्यावर हा तिसरा हल्ला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देशातील सर्वोत्तम पोलीस दल असलेले मुंबई पोलीस हे महाविकास आघाडीचे नोकर असल्यासारखे वागत आहे, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. मुंबई पोलिसांनी सोमय्यांवरील हल्ल्याची गंभीर दखल घेतली नसून हा प्रकार हल्ल्याचे समर्थन करण्यासारखं असल्याचे फडणवीसांनी म्हटले. राजकीय दबावामुळे त्यांना हल्लेखोरांविरोधात पावले उचलता येत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा : संजय राऊत
- 'भाजप नाच्या पोरांसारखा बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच'; शिवसेनेची खरमरीत टीका