(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई पोलिस आता कारवाई करणार का?, भाजप नेत्यावरील हल्ल्यानंतर फडणवीस संतापले
Devendra Fadnavis : 'मातोश्री' बाहेरुन जात असताना भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला.
Devendra Fadnavis : 'मातोश्री' बाहेरुन जात असताना भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. मोहित कंबोज हे 'मातोश्री' बाहेर उभे राहून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या हल्ल्यानंतर भाजपचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपला राग व्यक्त केला. तसेच मुंबई पोलिस आता हल्लेखोरांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केलाय. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ उद्या मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणाची आपण पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही मोहित कंबोज यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत हल्लाबोल केलाय. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस पहिल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'मोहित कंबेज- भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही.' दुसऱ्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी प्रश्न विचारलाय. फडणवीस म्हणतात, 'आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच.या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची आमची मागणी आहे. '
मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2022
महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही@mohitbharatiya_
मोहित कंबोज काय म्हणाले?
मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. साधारणपणे रात्री साड नऊ वाजता मोहित कंबोज हे कलानगर परिसरातून जात होते. मोहित कंबोज यांची गाडी दिसल्यानंतर शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. मोहित कंबोज म्हणाले की, "भाजप नेते आणि आपण एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणाहून परतत असताना कमलानगरच्या जंक्शनच्या ठिकाणी माझ्या गाडीवर हल्ला केला. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसून विरोधी पक्षनेत्यांवर हल्ले केले जात आहेत."