'महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा जरांगेंनी केली'; मराठा आंदोलनाचे पडसाद अधिवेशनात; आशिष शेलार आक्रमक
Ashish Shelar : कोणता मोठा कट आहे का? आणि महाराष्ट्र बेचिराख होण्याची योजना कोण करत आहे याचा शोध घेतला पाहिजे असे शेलार म्हणाले आहेत.
मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा अधिवेशनात देखील गाजताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिका आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या टिकेवरून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. 'महाराष्ट्र बेचिराख होण्याची भाषा जरांगेंनी केली असून, हे काय चालले आहे असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कोणता मोठा कट आहे का? आणि महाराष्ट्र बेचिराख होण्याची योजना कोण करत आहे याचा शोध घेतला पाहिजे असे शेलार म्हणाले आहेत.
यावेळी बोलतांना आशिष शेलार म्हणाले की, “आपण 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांचं काल टीव्हीवर पाहत होतो. काल त्यांनी महाराष्ट्र बेचिराख होईल अशी भाषा वापरली. त्यांनी बेचिराख हा शब्द वापरला. त्यामुळे त्यांनी वापरलेली भाषा आणि कोर्टाची टिपण्णी हे गंभीर आहे. कोणता मोठा कट आहे का?, जर महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा करत असेल तर ही धमकी आहे का?, याचा काही कट आहे का?" असे शेलार म्हणाले.
एसआयटी चौकशी करा...
पुढे बोलतांना आशिष शेलार म्हणाले की, “निपटून टाकू आणि बेचिराख करु असे जरांगे म्हणतात. ही योजना कोणी आखली आणि यामागे कोण आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवारांचे प्रत्युत्तर...
आशिष शेलार यांच्या मागणीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका सभागृहात मांडली आहे. "अशा भाषेचा आम्ही समर्थन करत नाही. मला देखील जरांगे कुत्रे म्हणाले. तुम्हाला चौकशी करायाची तर करा. कुठून दगड आले, कुठून तलवारी आल्या यांची चोकशी होऊ दया. मात्र, या प्रकरणात कोण पुढे गेलं आणि कोण हिरो बनायला पाहत होते. चौकशी करायला कोणी थांबवल. बेचिराख करण्याची भाषा खपवुन घेतली जाणार नाही. मनोज जरांगे राजकारणी नाहीत, आमचे वैचारिक मतभेद असतील. मात्र, समाज माझ्या पाठीशी आहे हे कोण दाखवत होते असे म्हणत वडेट्टीवार यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
विधानसभा-लोकसभा निवडणुकीत 'फोन टॅप' करण्यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ; रोहित पवारांचा खोचक टोला