Ashadhi Wari 2023: संत एकनाथ महाराजांची पालखी गावकऱ्यांनी अडवली, पारंपारिक मार्गावरुन जाण्याची मागणी
Ashadhi Wari 2023: संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्त्याची दुरवस्था पाहता यंदा मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहे.
Ashadhi Wari 2023: शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) पालखीने काल शनिवारी (10 जून) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले असताना, आज सकाळी पालखी अडवण्यात आली आहे. पैठणच्या दादेगावमधील गावकऱ्यांनी ही पालखी अडवली असल्याची माहिती समोर येत आहे. संत एकनाथ महाराज पालखी मार्गातील रस्त्याची दूरवस्था पाहता यंदा मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षे ज्या गावातून ही पालखी जाते त्या गावातील नागरिकांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळेच पालखी अडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पैठण येथून निघणारी संत एकनाथ महाराज पालखी दादेगावमधून जात असते. मात्र या मार्गावर मोठ्याप्रमाणावर काटेरी झुडपे, खडतर रस्ता असल्याने नेहमीच्या मार्गात बदल करण्यात आल्याने पालखी नवीन मार्गाने जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय मान्य नसल्याचे म्हणत गावकऱ्यांनी पालखी अडवली आहे. तसेच गावकऱ्यांनी रस्ता रोको केला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून, लवकरच यावर मार्ग काढून पालखी मार्ग करणार असल्याची माहिती पालखीमधील वारकऱ्यांनी दिली आहे. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांच्याकडून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर यावर लवकरच तोडगा निघणार आहे.
वारकऱ्यांना प्रत्येकवर्षे मूलभूत सोयीसुविधांसाठी लढावे लागते
आषाढी सोहळ्यासाठी पैठण येथून जाणाऱ्या नाथाच्या पालखीतील वारकऱ्यांना प्रत्येक वर्षे मूलभूत सोयीसुविधांसाठी शासनदरबारी लढावे लागते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालखीस प्रस्थानत्रयी म्हणून ओळखले जाते. आळंदी, देहू आणि पैठण येथून या पालख्या निघतात. दरम्यान आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या पालखीस राज्य शासन विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देते. याउलट संत एकनाथ महाराज यांच्या पालखीस मूलभूत सोयीसुविधेसाठी प्रशासनाकडे झगडावे लागत आहे. आरोग्य, पोलीस बंदोबस्त, मुक्कामासाठी जागा, पाण्याचे टँकरपासून ते पालखीसोबतच्या दिंड्यांना पंढरपुरातील प्रवेशास लागणाऱ्या पाससाठी संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागातून जाणारी संत एकनाथ महाराज यांची एकमेव पालखी असून या पालखीस सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
असे होणार पाच रिंगण सोहळे
पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर पाच 'रिंगण सोहळे' होणार आहेत. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडणार आहे. पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23 जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27 जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. 2 जुलै रोजी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करुन पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार असल्याचे पालखी प्रमुख रघुनाथबुआ गोसावी यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ashadhi Wari : पालखीसाठी नाथनगरी सज्ज, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचं आज प्रस्थान