नगरचे नेते कमी पडतात म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे जबाबदारी; रोहित पवारांचा राम शिंदेंना अप्रत्यक्ष टोला
भाजपने मिशन-2024 अंतर्गत राम शिंदे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी न देता देवेंद्र फडणवीसांकडे दिल्याने आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांना टोला लगावला आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी पडतात म्हणूनच भाजपने 'मिशन- 2024' अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता माजी मंत्री राम शिंदे यांना चिमटा काढला आहे. महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली असताना भाजपने मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याअंतर्गत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची जबबादारी देण्यात आली आहे.
नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवारांची बाजी, राम शिंदेंना धक्का
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. तर याच वर्षाच्या सुरुवातीला कर्जत नगरपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निवडणूक लढत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत भाजपला धूळ चारली. राष्ट्रवादीला 12 आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर आता मिशन-2024 अंतर्गत राम शिंदे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी न देता देवेंद्र फडणवीसांकडे दिल्याने रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांना टोला लगावला आहे.
राम शिंदे यांच्याबद्दल बोलावं एवढे ते मोठे नाहीत : रोहित पवार
तर, यूपीएच्या अध्यक्षपदावरुन भाजप नेते राम शिंदे यांनी 'ते काय महाराष्ट्रातील पद नाही की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी शरद पवार यांच्या नावाचा ठराव मांडावा' अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राम शिंदे काही एवढे मोठे नेते नाहीत की, त्यांच्याबद्दल बोलावं. भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने यूपीए अध्यक्षपदाबाबत भाष्य केलेलं नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांना लगावला.
2024 साठी भाजपकडू मोर्चेबांधणी सुरु, फडणवीसांकडे नगर आणि सोलापूर जिल्हा
2024 च्या निवडणुकीला तब्बल अडीच वर्ष शिल्लक असतानाच भाजपने प्रमुख डझनभर नेत्यांवर येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी दोन लोकसभा आणि बारा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. भाजपची कोअर कमिटीच्या बुधवारी (30 मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात प्रत्येक नेत्याला दोन लोकसभा मतदारसंघ आणि बारा विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधणी करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. येत्या 15 ते 30 एप्रिल दरम्यान डझनभर नेते संबंधित जिल्ह्यात प्रवास करतील. यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची जबबादारी देण्यात आली आहे.