teacher posts vacant in maharashtra : राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले!
राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा आणि छावणी शाळांमध्ये मिळून तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहेत.
Teacher Posts Vacant In Maharashtra : राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा आणि छावणी शाळांमध्ये मिळून तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद आणि छावणी शाळा मिळून एकूण मंजूर पदे 2 लाख 45 हजार 591 आहेत. यामध्ये कार्यरत पदे 2 लाख 14 हजार 119 आहेत, तर एकूण रिक्त पदांची संख्या तब्बल 31 हजार 472 आहे. यावरून राज्यातील शिक्षकांविना शाळांची अवस्था किती विदारक आहे, हे स्पष्ट होते.
राज्यातील रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या पदांबाबत माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वाधिक विदारक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये मंजूर पदे 2 लाख 19 हजार 428 असून कार्यरत पदे 1 लाख 99 हजार 976 पदे कार्यरत आहेत. रिक्त पदे तब्बल 19 हजार 452 आहेत.
मनपा शाळांची स्थिती काय?
महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मंजूर पदांची संख्या 19 हजार 960 असून त्यापैकी 8 हजार 862 पदे कार्यरत आहेत. मनपा शाळांमध्ये 11 हजार 98 पदे रिक्त आहेत.
नगरपालिका शाळांची अवस्था तुलनेत बरी
नगरपालिका शाळांमध्ये परिस्थिती मनपा आणि झेडपीच्या तुलनेत बरी आहे असे म्हणावे लागेल. नगरपरिषदांच्या शाळांमध्ये मंजूर पदे 6 हजार 37 असून त्यापैकी 5 हजार 136 पदे कार्यरत असून रिक्त पदे 901 आहेत.
छावणी शाळा
छावणी शाळांमध्ये मंजूर पदे 166 असून कार्यरत पदे 145 आहेत आणि रिक्त पदे 21 आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असतानाच आहे त्या शिक्षकांवर शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्याचे आव्हान आहेच, पण त्याचबरोबर शासनाकडून शाळाबाह्य कामे करून घेण्याचा सपाटाच लावला जात आहे. त्यामुळे शिक्षक आहे की शासनाचा राबता गडी? अशी अवस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची झाली आहे.
शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक बेजार
शासनाकडून राबता गडी असल्यासारखे शिक्षकांकडून शाळाबाह्य अनेक कामे करून घेतली जात आहेत. त्यामुळे बेजार झालेल्या शिक्षकांनी शासनाकडे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि शाळाबाह्य कामातून मुक्तता करा, अशी मागणी राज्यातील शिक्षकांनी आंदोलन केले होते. एकीकडून गुणवत्तेची अपेक्षा करायची, दुसरीकडे त्यांच्याकडून हमालासारखी कामे करून घ्यायची आणि तिसरीकडे त्यांची मंजूर पदे भरायची नाहीत. त्यामुळे शिक्षकांची अवस्था बिकट होऊन गेली आहे.