मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवाली ग्रामस्थांचाच विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन; काय आहे राज'कारण'
ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला.
जालना : देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता लागली असून आपल्या मतदारसंघात कोण खासदार होणार, याचीच चर्चा सुरू आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालांतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी केली होती. मात्र, जरागेंच्या आंदोलनास आता अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं ठिकाण बदलणार?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मनोज जरांगेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेल्या अंतरावाली सराटी गावातील लोकांनीचा आता त्यांच्या आंदोलनास विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. आता, त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केला आहे.
जरांगे यांनी 4 जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, उद्या 4 जूनला मनोज जरांगे उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले आहे. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे.
29 ऑगस्ट रोजी जनआक्रोश आंदोलन
मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये त्यांनी उपोषणे केली. त्यांच्या येथील आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलनास हिंसक वळण मिळालं होतं. त्यानंतर, राज्यभर हे आंदोलन भडकलं. आता अंतरवाली सराटी येथे 4 जूननंतर पुन्हा मनोज जरांगे यांचं उपोषण होणार असून येणाऱ्या काही दिवसात पावसाळाही सुरू होणार आहे. त्यामुळे उपोषणस्थळी पत्र्याचा मंडप टाकण्यात आला आहे. मात्र, काही गावकऱ्यांनी या उपोषणास विरोध केला आहे.