Anil Parab : अनिल परब यांचा विजय, भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव; मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचा डंका
Vidhan Parishad Election Result : अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव केला असून शिवसेना ठाकरे गटाला आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळालं आहे.
Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency Election) अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब (Anil Parab) आणि भाजपचे किरण शेलार (Kiran Shelar) यांच्यात लढत होती. मतदारांनी भाजपला नाकारलं असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं.
अनिल परबांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रमेश किर हे उभे होते.
मुंबईत फक्त आमचंच चालणार
विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटकपक्ष लढले त्यांचा आभारी आहे.
मुंबई फक्त शिवसेनेचीच असल्याचं सांगत अनिल परब म्हणाले की, 'शिवसेना आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची' हे सिद्ध झालं आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच असणार, तीही उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार. मुंबईचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभार आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.