(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अल्प बुद्धी, बहु गर्वी... अमृता फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
आशिष शेलार यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा सवाल उपस्थित केला आहे?
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु, आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु झाला आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा ही ठाकरे सरकारची कार्यपद्धती असल्याची टीका केली होती. आशिष शेलार यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असा सवाल उपस्थित केला आहे?
भाजप नेते आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती... विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! मेट्रो कारशेडचे असेच चालले आहे. या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, अल्प बुद्धी , बहु गर्वी - कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?
अल्प बुद्धी , बहु गर्वी - कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ? #maharashtragovt #disaster https://t.co/qU7QB0w49h
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 3, 2020
कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राचा दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय, अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली आहे. तर कांजूरमार्गची जागा केंद्र सरकारच्याच मालकीची आहे. इथे कारशेड आणण्यात अडचणी येणार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित होतं, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव सचिन कुमार यांना पत्र पाठवून कारशेडच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याचं समोर येत आहे. "कांजूरमार्गची जागा मिठागराची असून, त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. 'एमएमआरडीए'ने यापूर्वीही या जागेवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र तो फेटाळला होता. आता या जागेवर परस्पर कारशेड उभारलं जात असून, ते चुकीचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं मोठं नुकसान होणार आहे. याबाबत तातडीने हस्तक्षेप करत एमएमआरडीने सुरु केलेलं कारशेडचं काम थांबवावं, असं या पत्रात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :