सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन
मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
FIR Against Google CEO: जानवर, एक रिश्ता, अंदाज, बरसात, हां मैंने भी प्यार किया है, शकालाका बूम बूम यासारख्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे मुंबई पोलिसांनी सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या 'एक हसीना थी एक दिवाना था' या चित्रपटाचे कॉपीराईट कोणालाही दिलेले नाहीत. असे असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडिओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2017 मधील एक हसीना थी, एक दिवाना था हा चित्रपट मला न विचारता यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. कॉपीराईट पूर्णपणे माझ्याकडे आहे आणि मी या चित्रपटाचे हक्क विकलेले नाहीत, असे असतानाही हा चित्रपट अपलोड करण्यात आला असल्याचे सुनील दर्शन यांनी सांगितले. या चित्रपटाला मिळणाऱ्या हिट्सचा फायदा काही दुसऱ्याच व्यक्ती आणि यूट्यूबला होत आहे. एक निर्माता म्हणून मला त्यातून एक पैसाही मिळत नाही. अशा परिस्थितीत मी गेल्या अनेक महिन्यांपासून यूट्यूब आणि गुगलच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न करत होतो. पण पोलिसांमार्फत थेट तक्रार दाखल करण्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे मी सेशन्स कोर्टाचा सहारा घेतला. कोर्टाने पोलिसांना कॉपीराईटच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सुनील दर्शन यांनी सुंदर पिचाई यांच्यासह गुगल आणि यूट्यूबशी संबंधित आणखी 5 अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. यामध्ये गौतम आनंद, जो गियर, नम्रता राजकुमार, पवन अग्रवाल आणि चैतन्य प्रभू यांचा समावेश आहे. या सर्वांवर कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना जाब देखील विचारण्यात आला आहे. एक हसीना थी, एक दिवाना था याआधीही त्यांनी गुगल आणि यूट्यूबविरोधात तक्रार दाखल केली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्याचे सुनिल दर्शन यांनी सांगितले.
माझ्या श्री कृष्णा इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत जवळपास 20 चित्रपटांचे कॉपीराईट माझ्याकडे आहेत. पण त्याआधी, एक हसीना थी, एक दिवाना वगळता, माझ्या जवळपास प्रत्येक चित्रपट आणि त्यांची गाणी YouTube वर अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी 2011 मध्ये गुगल आणि यूट्यूबविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 2019 पर्यंत चालले आणि न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला. परंतू, 2019 मध्ये Google आणि YouTube ने या निर्णयानंतर चंदीगढ उच्च न्यायालयात अपील केले होते. तिथे हे जुने प्रकरण अजूनही प्रलंबित असल्याचे सुनिल दर्शन यांनी सांगितले.