(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी पैसे मागितल्याचा, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यास सांगितला; अनिल देशमुखांचा सनसनाटी दावा
Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला तीन वर्षांपूर्वी ही ऑफर दिली होती. माझ्या शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला देण्यात आली होती असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं.. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले, पण मी ते आरोप केले नाहीत, असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला आहे.
फडणवीसांच्या खास माणसाकडून मला शासकीय निवासस्थानी ऑफर
देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला तीन वर्षांपूर्वी ही ऑफर दिली होती. माझ्या शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला देण्यात आली होती असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. ही ऑफर मला देण्यात आली त्या संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर आणेन, असं अनिल देशमुख म्हणाले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी केलेले आरोपांमध्ये तथ्य असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
अजित पवारांवरही आरोप करण्यास सांगितले
अनिल देशमुख म्हणाले की, मला अनिल परब यांच्या विरोधातही आरोप करण्यास सांगण्यात आले होते. अजित पवारांबद्दल गुटखा व्यावसायिकांच्या संदर्भात आरोप करण्यास सांगण्यात आले होते. मी हे काहीही केलं नाही म्हणूनच मला 13 महिने तुरुंगात राहावं लागलं असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. दरम्यान जेव्हाही ऑफर अनिल देशमुख यांना देण्यात आली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती त्यामुळे अशा ऑफरबद्दल तुम्ही शरद पवार आणि अजित पवार यांना कल्पना दिली होती का? या प्रश्नावर मात्र अनिल देशमुख यांनी मौन बाळगले. वारंवार विचारणा करूनही त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. दरम्यान, अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांच्या खास माणसाकडून देण्यात आली होती याचा पण पुनरुच्चार मात्र त्यांनी केला.
पुरोगामी संघटना ठोस भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत
दरम्यान, "संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा" असं अभियान राबवून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व पुरोगामी संघटना विधानसभा निवडणुकीत ठोस भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज (24 जुलै) यासंदर्भात नागपूरातील विनोबा विचार केंद्रात महाराष्ट्रातील विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांची एक प्राथमिक बैठक बोलावली आहे.
संविधानातील मूल्ये पायदळी तुडवून संविधान धोक्यात आणलं जात आहे, हे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीही आम्हाला जाणवलं होतं. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत विदर्भात 36 छोट्या सभा घेतल्या. त्यामधून चांगले परिणाम येऊन आपणही मोदीला पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास छोट्या-छोट्या संघटनांमध्ये निर्माण झाला. म्हणूनच विधानसभेसाठी निश्चित भूमिका घेण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आजची बैठक होणार असल्याचे श्याम मानव म्हणाले. निवडणुकांचा निकाल आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, तो आमचा उद्दिष्टही नाही. मात्र, संविधान वाचवला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून "संविधान बचाव महाराष्ट्र बचाव" असा अभियान आम्ही राबवणार आहोत असेही श्याम मानव म्हणाले. आजच्या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, गुरुदेव सेवा मंडळ, अनेक दलित व ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या