(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhaji Raje Chhatrapati Protest : मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण
खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर ते उपोषण करणार आहेत.
Sambhaji Raje Chhatrapati Protest For Maratha Reservation : खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करणार आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज 11.30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. नेमका आजचा कार्यक्रम कसा असेल...
सकाळी 10:50 वजता मरीन ड्राईव्ह येथून सर्व समन्वयकांसह संभाजीराजे हुतात्मा चौक येथे येमार आहेत. त्यानंतर ११ वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत. 11:15 वाजण्याच्या दरम्यान आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आगमन होणार आहे, त्यानंतर संभाजीराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. 11:30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करतील, त्यानंतर उपोषणास सुरुवात होणार आहे.
या आंदोलनाला पाठबळ म्हणून अनेक ग्रामपंचायत, संघटना, तालीम संस्थांमार्फत ग्रामीण, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर बैठका होत आहेत. केवळ मराठा समाजच नव्हे, तर बहुजन समाजातील लोकांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून याबबतची ठराव पत्रे सकल मराठा समाजाकडे पाठविली असून, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी खासदार संभाजीराजे आजपासून उपोषणाला बसणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित याबाबत आधीचं त्यांनी सूचित केले होते. आता संभाजीराजे यांनी ट्वीट करत महाराष्ट्रभरातून आंदोलनाला येणाऱ्या मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, अशी रोखठोख मागणी केली आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे, पण आगामी काळातील धोका लक्षात घेता बीएमसी प्रशासन काय निर्णय घेणार? हे येणारा काळच ठरवेल.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती ! असे ट्वीट संभाजीराजे केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री वळसे पाटील, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले आहे.
काय आहेत मागण्या
- मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
- मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजाणी करण्यास तत्काळ सुरूवात करून, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी.
- ईसीबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
- सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे दिला जाणारा दहा लाख रूपये कर्ज व्याज परतावा हा 25 लाख रुपये करण्यात यावा.
- महामंडळ व्यवस्थित चालण्यासाठी, प्रशासकिय निर्णय घेण्यासाठी तसेच नविन योजना निर्माण करण्यासाठी महामंडळास संचालक मंडळ असणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या: