चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता, अॅड नितीन सातपुते यांची महिला आयोगाकडे तक्रार
Chitra Wagh vs Uorfi Javed : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार अॅड. नितीन सातपुते यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.
Chitra Wagh vs Uorfi Javed : भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या धमकीमुळे अभिनेत्री उर्फी जावेदचं (Uorfi Javed) मॉब लिंचिंग (Mob Lynching) होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार अॅड. नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra Women Commission) केली आहे. सातपुते यांनी लेखी आणि ऑनलाईन स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. धमकी दिल्याप्रकरणी महिला आयोगाने दखल घेऊन चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी देखील अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्या उर्फी जावेदबाबत "दिसेल तिथे थोबाड फोडण्यात येईल" या वक्तव्याचा उल्लेख तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
मागच्या काही दिवसांपासून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी पत्रही दिलं होतं. त्यावर 'माझा नंगानाच सुरुच राहिल', असं उत्तर उर्फीने दिलं होतं.
अॅड. नितीन सातपुते यांनी तक्रारीत काय म्हटलंय?
उर्फी जावेदच्या कपडे परिधान करण्याच्या स्टाईलवरुन चित्रा वाघ लोकांना गुन्हा करण्यास प्रवृत्त करत आहेत. चित्रा वाघ यांचे समर्थक उर्फीला ट्रोल करत असून तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी तिला भररस्त्यात थोबाडीत मारण्याची धमकी देखील दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये चित्र वाघ यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना उर्फी जादेवला थोबाडीत मारण्याची खुलेआम धमकी दिली होती.
ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल, त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेल आणि नंतर मी ट्वीट करुन सांगेन की मी काय केलंय ते. आजही सांगते उर्फी जावेद समोर आली तर तिला आधी साडी चोळी देऊ. मात्र त्यानंतरही तिने तिचा नंगानाच सुरु ठेवला तर थेट थोबाड फोडणार आहे. उर्फीला कपड्यांची अॅलर्जी असेल तर सगळ्या प्रकारच्या गोळ्या देण्यास सक्षम आहोत, असं चित्रा वाघ म्हणाल्या होता.
त्यामुळे उर्फी जावेदच्या जीवाला चित्र वाघ आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे. ते सातत्याने उर्फीला सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्रास देत आहेत. तरीही वाघ यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. उर्फी जावेदच्या जीवाचं बरं वाईट होण्याची वाट पाहत आहेत का?
त्यामुळे तुम्ही या प्रकरणात सुमोटो दाखल करुन चित्रा वाघ यांच्याविरोधात सीआरपीसी कलम 154, भादंवि कलम 153 (A) (B), 504, 506 (ii) अंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत आहे.
उर्फी जावेद महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेणार
ऊर्फी जावेद आज राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात वादाच्या ठिणगी पडली आहेत. त्यातच आज उर्फी जावेद आज महिला आयोगात जाणार आहे. उर्फी जावेद सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मागील काळात सार्वजनिक ठिकाणी मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उर्फी जावेद तक्रार करण्याची शक्यता आहे.
VIDEO : Urfi Javed : उर्फी जावेद Rupali Chakankar यांची भेट घेणार, चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार करणार?