पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी?
ST Workers Strike : संपानंतर कामावर रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून एसटी प्रशासनाकडून संप करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले जात आहेत.
ST Workers Strike Updates : वेतन वाढ व एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सरकार, एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले. मात्र, भविष्यात संप करणार नाही, अशा पत्रावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेतली जात आहेत. याबाबतचे पत्र व्हायरल होत आहे.
राज्यातील एसटी आगारातून एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही मोठा कर्मचारी वर्ग अजूनही संपावर आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेक कर्मचारी संपातून माघार घेत सेवेत रूज होत आहे. आता अशा कर्मचाऱ्यांकडून काही विभागांमध्ये 'वचनपत्र' भरून घेतले जात आहे. व्हायरल होणाऱ्या 'वचनपत्रा'तील मजकूरही कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारा असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले.
वचनपत्रातील मजकूर काय?
ठाणे विभागीय कार्यालयाच्या वचनपत्रानुसार, आठ नोव्हेंबर 2021 पासून सुरू झालेल्या बेकायदेशीर संप/ आंदोलनात सहभागी झालो होतो. आज दिनांकपासून कर्तव्यावर रुजू होत आहे. या पुढे संपात सहभागी होणार नाही. तसेच आंदोलन कालावधीत रजेची मागणी करणार नाही असे वचनपत्र सादर करत आहे, असा मजकूर वचनपत्रात नमूद करण्यात आला आहे. भविष्यातील संपात सहभागी झाल्यास प्रशासनाकडून होणारी कारवाई मान्य असेल असेही या वचनपत्रात म्हटले आहे.
निलंबन कारवाईच्या भीतीने वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी असलेले नांदेड आगारातील वाहक दिलीप विठ्ठलराव वीर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नांदेड आगारात जवळपास 450 एसटी कर्मचाऱ्यावर महामंडळाने निलंबनाची कार्यवाही केली आहे. आज प्रशासनाने वीर यांच्यावर कारवाई केली. कारवाईच्या धसक्याने त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
एसटीच्या एमडी समोर कर्मचाऱ्यांनी मांडली व्यथा
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्या सोबत तब्बल अडीच तास संवाद साधला मात्र या चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही.. उलट यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. शेखर चन्ने यांनी यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्या ना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.. त्यावेळी ते म्हणाले की शासनाने मान्य केलेल्या मागण्या नक्कीच पूर्ण केल्या जातील अशी तरतूद करण्यात आलेली आहे.. पूर्वी नव्याने रुजू होणार्या कर्मचाऱ्याला बारा हजार रुपये पर्यंत वेतन मिळत होते ते आता चोवीस हजार रुपये मिळणार आहे. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात शासन व एसटी महामंडळ कटीबध्द आहे असे सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: