कुठं लपवल्या झोपडपट्ट्या, तर कुठं पकडली माकडं आणि कुत्री, जाणून घ्या नक्की भारतात चाललंय तरी काय
G20 Meeting : डिसेंबर महिन्यात जी-20 देशांचे प्रतिनिधी शिखर परिषदेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. परंतु, मुंबईतील झोपडपट्ट्या कापड्याने झाकल्याचे फोटो समोर आले आहेत.
G20 Meeting : भारताने 1 डिसेंबर 2022 पासून औपचारिकपणे G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. G-20 देशांचे प्रतिनिधी शिखर परिषदेसाठी देशातील अनेक शहरांना भेट देत आहेत. ही शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी भारताने देखील जोरदार तयारी केली आहे. परंतु, या तयारीदरम्यान अशी काही छायाचित्रेही समोर आली आहेत जी आश्चर्यचकित करणारी आहेत. जेथे-जेथे या परिषदेचे प्रतिनिधी भेटी देणार आहेत अशा भागातील झोपडपट्ट्या कापडाने झाकल्या जात आहेत, तर कोठे माकडे आणि भटक्या कुत्र्यांना पकडले जात आहे.
डिसेंबर महिन्यात जी-20 देशांचे प्रतिनिधी शिखर परिषदेसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. परंतु, मुंबईतील झोपडपट्ट्या कापड्याने झाकल्याचे फोटो समोर आले आहेत. झोपडपट्टीचा परिसर कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने झाकण्यात आला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील माहीम, वरळी, वांद्रे ते बोरिवलीपर्यंतच्या भागात असे पडदे लावले आहेत. या भागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी कधीच या भागात अशी स्वच्छता पाहिली नव्हती अशी स्वच्छता करण्यात आली आहे.
आग्रा येथे माकडं आणि भटकी कुत्री पकडली
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथेही जी-20 प्रतिनिधी दाखल होण्यापूर्वी ताजमहाल येथील माकडं आणि भटकी कुत्री प्रशासनाकडून पकडण्यात आली आहेत. G-20 चे प्रतिनिधी पुढील महिन्यात आग्रा येथे भेट देऊ शकतात. त्याआधी शहरभरातून भटकी कुत्री पकडली जात असल्याचे महापालिका आयुक्त निखिल टिकाराम फुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ताजमहाल संकुलात दोन परदेशी महिलांना माकडांनी चावा घेतला होता. असे प्रकार घडू नयेत म्हणून ही तयारी केली जात आहे. 10 हजार माकडे पकडण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागितली होती, मात्र केवळ 500 माकडे पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
दिल्लीत झोपडपट्ट्या खाली करण्यासाठी नोटीसा?
G-20 च्या आधीच देशाच्या राजधानीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कडाक्याच्या थंडीत नैऋत्य दिल्लीच्या धौला कुआन सर्कलमधील झोपडपट्टीतील रहिवाशांना सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 दिवसांत जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. आगामी G20 शिखर परिषदेच्या तयारीमुळे असे केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. मात्र, विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा इन्कार करत हा अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचे सांगितले.
कश्मीरे गेट-कॅनॉट प्लेसमधील भिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश
मार्चमध्ये दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेपूर्वी कश्मीरे गेट आणि कॅनॉट प्लेसच्या आसपासच्या भिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या भिकारी लोकांना दिल्ली सरकारच्या झोपडपट्टी व्यवस्थापन एजन्सी, दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड (DUSIB) द्वारे चालवल्या जाणाऱ्या निवारागृहांमध्ये हलवले जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हा आदेश दिल्ली सरकारचा भिकाऱ्यांना जगाच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
अरिजित सिंगचा कोलकातामध्ये होणारा शो रद्द
G-20 कार्यक्रमांच्या तयारीदरम्यान गायक अरिजित सिंगचा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राज्य सरकारने सांगितले की अरिजित सिंगचा इको पार्क शो रद्द करण्यात आला आहे. कारण त्याच भागात जी-20 कार्यक्रमही होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या