Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणाऱ्या गद्दारांचे हात कलम करा, यांना घोड्यावर चढवलं, आता खाली ओढा; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Jalgaon Sabha : पाकिस्तानला विचारा शिवसेना कुणाची, ते पण सांगतील, पण आपल्याकडे निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जळगाव: जळगावातील सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कुणाची याची प्रचीती येते, पाकिस्तानला जरी शिवसेना कुणाची विचारली तरी तो सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे समजत नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. निवडून गेलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत असून, ज्यांनी भगव्याला कलंक लावला त्यांचे हात कायमचे काढून टाकायचे आहेत असंही ते म्हणाले. जळगावातील पाचोरा या ठिकाणच्या सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काही जणांना असं वाटतंय की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार असं काहीजण वल्गना करतात, पण निवडणुकीत त्यांच्या शेपटी आदळून त्यांची जागा दाखवावी. आज आर ओ पाटलांची उणीव भासते, एक कणखर आणि विश्वासू सहकारी जाणं हे परवडणारं नाही. अगदी चाळीस गद्दार जरी गेले तरी चालतील, पण एक विश्वासू सहकारी जाणं परवडत नाही.
कुणीतरी म्हणालंं की आजच्या सभेत घुसणार, मी त्याची वाट पाहत होतो असा टोला उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.
भाजपच्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज भाजपकडून गाईला जेवढी सुरक्षा दिली जाते, तेवढी सुरक्षा इथल्या आईला दिली जात नाही. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ठाण्यातील रोषणी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. ती हात जोडून कळवळत असतानाही तिच्या पोटात मारलं गेलं. पण तिची तक्रार नोंदवून न घेता, उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप ज्या राज्यामध्ये सत्तेत नाही त्या राज्यांमध्ये गोहत्या बंदी करण्यासाठी दबाव टाकणार आणि त्यांच्या राज्यात मात्र गोहत्येवर बंदी घालायची नाही अशी दुटप्पी भूमिका भाजपकडून घेतली जाते.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, गद्दारांनी आपल्या पक्षाचं नाव चोरलं आणि पक्ष चिन्ह चोरलं. तुम्ही धनुष्यबाण चिन्हासोबत या, मोदींचं नाव वापरा आणि निवडणुकीला सामोरं जावं. मी मशाल चिन्हासह निवडणूक लढवतो. मग बघू महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र हा मिंधेंच्या नाही तर माझ्या मागे आहे हे तुम्हाला समजेल. त्यांना विजयाची खात्री नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलत आहेत.
सत्यपाल मलिक म्हणाले त्या प्रमाणे पुलवामा हल्ल्यामध्ये निष्काळजीपणा झाला असेल तर त्या शहीदांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.