Dasara Melava : शिवसेनेचे दोन्ही गट ते कोल्हापुरातील शाही दसरा; पाच ठिकाणं अन् आज पाच जंगी कार्यक्रम
Shivsena Dasara Melava : शिवसेना ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंकजा मुडे आणि कोल्हापुरातील शाही दसरा... अशा पाच ठिकाणी आज दसऱ्याचे कार्यक्रम पार पडणार आहेत.
मुंबई: 30 ऑक्टोबर 1966... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने दसरा मेळाव्याची (Shivsena Dasara Melava) मुहूर्तमेढ रोवली. त्याला आता 57 वर्ष झाली. या 57 वर्षांत दरवर्षी बाळासाहेबांनी केलेल्या भाषणांनी पुढील काही दिवस महाराष्ट्र ढवळून निघायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. दोन शिवसेना आहेत आणि दोन दसरा मेळावेही.
आज उद्धव ठाकरेंची तोफ शिवतीर्थावरून धडाडणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. त्यासाठी तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीडच्या सावरगाव येथेही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे. महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडेंचा हा मेळावा होतोय. दरम्यान, उद्धव ठाकरेंची मशाल कुणाला धग देणार, तसेच, एकनाथ शिंदे धनुष्यातून कुणावर बाण सोडणार आणि पंकजा मुंडे मनातली खदखद मांडत कुणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेय.
उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर मेळावा (Uddhav Thackeray Group Dasara Melava)
शिवसेना उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर येणाऱ्या हजारो शिवसैनिकांसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे राज्यातील संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांची तोफ कुणावर धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर (Eknath Shinde)
शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून विशेष वाहनांची सोय करण्यात आली असून या मेळाव्यासाठी सव्वा लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे.
पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सावरगाव येथे (Pankaja Munde)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जशी शिवसैनिकांना तसाच उत्साह भगवानबाबांच्या गावी भरणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत पंकजा गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये असतो. खरं तर गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याला संबोधन करणं सुरु केलं. ते गेल्यावर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना विरोध करत दसरा मेळाव्याच्या भाषणाची प्रथा थांबवली. त्यानंतर गेली सहा-सात वर्ष पंकजा समर्थक सावरगाव घाट इथे दसरा मेळाव्याला गर्दी करत असतात.
कोल्हापूरात शाही दसरा (Kolhapur Dasara Melava)
देशातील म्हैसूरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारस असणाऱ्या शाहू घराण्यातील सदस्य उपस्थित असतात. गेल्या वर्षापासून राज्य शासनाचा या सोहळ्यामध्ये सहभाग सुरू झाला आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत तसेच समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठीचे नियोजन, विविध सांस्कृतिक व अन्य उपक्रमांची रुपरेषा, महोत्सवाची व्यापक प्रसिध्दी, आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक ठिकाणांचे आणि मिरवणूक मार्गांचे सुशोभिकरण, नागरिक, पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा आदींबाबत पूर्ण तयारी झाली आहे.
नागपुरात स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव (Nagpur RSS Vijaydashmi Sohala)
आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव पार पडणार आहे. परंपरेनुसार संघाचं पथसंचलन आणि शस्त्रपूजन झाल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करतील. नागपुरातील या विजयादशमीची तयारी पूर्ण झाली आहे.
ही बातमी वाचा: