Sanjay Raut: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल: संजय राऊत
Sanjay Raut: बाळासाहेब आज असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतं, असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेनेला भाजपसोबत अजिबात जायचे नव्हते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शब्दाला पक्के असे गृहस्थ आहेत. तटकरे यांचे दावे चुकीचे आहेत. तटकरेंच्या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरेंचे (Sunil Tatkare) सर्व दावे फेटाळले आहेत. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात राऊत बोलत होते. तसेच मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, मोदी शाह यांनी ठरवलं तर ते कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात , पण सत्ता कायमची नाही, तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी शाह खोटारडे, त्यांनी देशाला तेच धडे दिले. शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार आहे. शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही. आम्ही 30 ते 35 जागा जिंकणार आहे.
भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुखमंत्री असते : संजय राऊत
भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुखमंत्री असते. 2019 मध्ये भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात खेळ खंडोबा केलाय. आम्ही तुरुंगात गेलो, आजारी पडलो आज माझा डावा हात चालत नाही पण आम्ही भांडवल केलं नाही. ज्या पक्षाने सर्वस्व दिलं त्यासाठी मी लढत राहणार, मी पलायन करणार नाही, मी लढायला आणि मरायला तयार आहे . भाजपसोबत कधी जाणार नाही. इंडिया आघाडीला 300 जागा मिळती, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब आज असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतं: संजय राऊत
मोदींनी मला मुलाखत दिली तर एक प्रश्न विचारेल बाळासाहेबांचं उपकार होते तर त्यांचा पक्ष का तोडला? बाळासाहेब आज असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतं, असेही संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट